महाराष्ट्रात ‘टॉप थ्री’ मध्ये गोंदिया

By Admin | Updated: May 9, 2016 01:45 IST2016-05-09T01:45:17+5:302016-05-09T01:45:17+5:30

जिल्ह्यातील आदिवासी व ग्रामीण जनतेच्या आरोग्यविषयक सर्व समस्या सुटाव्यात यासाठी गोंदियाच्या आरोग्य विभागामार्फत प्रयत्न केले जात आहेत.

Gondia in Top Three in Maharashtra | महाराष्ट्रात ‘टॉप थ्री’ मध्ये गोंदिया

महाराष्ट्रात ‘टॉप थ्री’ मध्ये गोंदिया

जीवनदायीतून रुग्णांवर १० कोटी खर्च
नरेश रहिले गोंदिया
जिल्ह्यातील आदिवासी व ग्रामीण जनतेच्या आरोग्यविषयक सर्व समस्या सुटाव्यात यासाठी गोंदियाच्या आरोग्य विभागामार्फत प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी धकाते यांच्या अखत्यारित येत असलेल्या १० ग्रामीण रूग्णालयांसह केटीएस, बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय व तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात देण्यात येणाऱ्या सेवांबद्दल जिल्हा महाराष्ट्रात टॉप थ्री मध्ये असल्याचे स्वत: आरोग्य सेवा, मंत्रालयाचे प्राधन सचिवांनी हिट अ‍ॅक्शन कार्यक्रमात जाहीर केले.
आरोग्य सेवेचे सबलीकरण व श्रेणीवर्धन करण्यासाठी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धकाते यांनी जिल्ह्यात केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा गोवा येथे आयोजित जागतिक आरोग्य परिषदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना मांडला. आरोग्य सेवेत अडचणी व त्यावर उपाय यावर त्यांनी मार्गदर्शन केले. कायाकल्पमध्ये गोंदिया राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
क्षय रूग्णांसाठी वरदान ठरणारी सीबीनेट मशीन बसविण्यात आली. आपातकालीन सेवेचा ६०२१ रूग्णांना लाभ देण्यात आला. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात लेप्रोस्कोपी मशीन सेवा सुरू करण्यात आली. २० विद्यार्थिनींसाठी ए.एन.एम. नर्सिंग स्कूल तयार करण्यात आले. आधुनिक यंत्रासह हायटेक आयसीयू तयार करण्यात आले. जननी शिशू सुरक्षा योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना अशा सर्वच योजनांचा लाभ रूग्णांना देण्यात रूग्णालय यशस्वी राहीले आहे.

१० हजार ४८९ लोकांची नोंदणी
२१ नोव्हेंबर २०१३ रोजी राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू करण्यात आली. सदर योजनेत अल्प उत्पन्न असलेल्या पिवळा व शेंदरी कार्डधारकांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. आजपावेतो १० हजार ४८९ लोकांची यासाठी नोंदणी करण्यात आली आहे. ४ हजार ६४४ लोकांना या सेवेचा लाभ देण्यात आला आहे. त्यांच्यावर ९ कोटी ९९ लाख ८६ हजार २६५ रूपये आतापर्यंत खर्च करण्यात आले आहे.

डायलिसीसमध्ये गोंदिया मॉडेल
केटीएस येथे सन २०१३-१४ मध्ये डायलिसीस केंद्र सुरू करण्यात आले. त्यात आतापर्यंत ३ हजार ९६१ रूग्णांना या सेवेचा लाभ देण्यात आला. या डायलिसीस युनिट व आयसीयुला प्रल्प संचालक व आरोग्य संचालकांनी महाराष्ट्रात अव्वल असल्याचे घोषित केले व गोंदियाला मॉडेल म्हणून प्रस्तावित करण्यात आले आहे.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची मागणी
गोंदिया जिल्हा आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त अतिदुर्गम आहे. तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड व मुंबई-हावडा रेल्वे मर्गावर असल्यामुळे येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तयार करण्याची मागणी डॉ. धकाते यांनी केंद्रीय पथकाकडे केली आहे. हे रूग्णालय स्थापन केल्यास अँॅजीयोग्राफी, अँजीयोप्लास्टी, कार्डीओथोरॅसीक सर्जरी, किडणी ट्रान्सप्लान्ट, कर्करोग, न्यूरोसर्जरी, अतिदक्षता विभागाची सेवा मिळेल. त्यामुळे येथील रूग्ण नागपूरला जाणार नाहीत.

Web Title: Gondia in Top Three in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.