गोंदिया तालुका झाला कोरोनाचा हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:28 IST2021-03-18T04:28:43+5:302021-03-18T04:28:43+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १८८ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण गोंदिया तालुक्यात आहेत. ...

गोंदिया तालुका झाला कोरोनाचा हॉटस्पॉट
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १८८ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण गोंदिया तालुक्यात आहेत. तर याच तालुक्यात दररोज २५ ते ३० रुग्णांची भर पडत असल्याने गोंदिया तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट झाला असून आमगाव आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातसुद्धा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढ आहे. त्यामुळे या तालुक्यातील नागरिकांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे.
जिल्ह्यात बुधवारी (दि. १७) ३९ कोेरोनाबाधितांची नोंद झाली. यात सर्वाधिक २४ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तिरोडा १, गोरेगाव २, आमगाव ५, देवरी १, सकड अर्जुनी २ आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ४ रुग्णांचा समावेश आहे. गोंदियानंतर आमगाव आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. बाकी तालुक्यात रुग्ण संख्या कमी असली तरी कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी जिल्हावासीयांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत ८७,७६८ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ७४,२५३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रपिड अँटिजेन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत ७६,७९५ जणांचे नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ७०,५७२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४,८४४ कोरोनाबाधित आढळले असून, यापैकी १४,३५५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ३०२ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून १,४६२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
.........
दररोज २१०० स्वॅब नमुन्यांची तपासणी
कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य विभागाने टेस्टिंग, ट्रेसिंगवर भर देण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत. त्याच धर्तीवर नमुने टेस्ट करण्याचे प्रमाण वाढविण्यात आले. गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची कोरोना नमुने तपासणीची क्षमता दररोज ३५० असली तर सद्य:स्थितीत दररोज २१०० स्वॅब नमुने तपासणी केले जात आहेत. टेस्टचे प्रमाण वाढविल्याने रुग्ण संख्येत थोडी वाढ दिसून येत आहे.
.......
कोरोनाचा पॉझिटिव्ह रेट १.९६ टक्के
जिल्ह्यात कोरोना टेस्टचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. दररोज २१०० नमुने टेस्ट केले जात आहेत. त्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण हे १.९६ टक्के आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी रेट २ टक्केच्या आत असल्याने ही थोडी दिलासादायक बाब आहे. पण, नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.
.......