मंगळयान मोहिमेत गोंदियाचा विद्यार्थी
By Admin | Updated: September 25, 2014 10:59 IST2014-09-25T01:30:10+5:302014-09-25T10:59:17+5:30
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्रोे) काम करून महत्वाकांक्षी अशा मंगळयान मोहिमेत विदर्भातील गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातील एका व्यक्तीनेही खारीचा वाटा उचलला आहे. नाशिकेत प्रेमलाल पराते

मंगळयान मोहिमेत गोंदियाचा विद्यार्थी
मूळ गाव देसाईगंज : १३ वर्षांपासून इस्रोत
गोंदिया : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्रोे) काम करून महत्वाकांक्षी अशा मंगळयान मोहिमेत विदर्भातील गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातील एका व्यक्तीनेही खारीचा वाटा उचलला आहे. नाशिकेत प्रेमलाल पराते असे त्यांचे नाव आहे. गेल्या १३ वर्षांपासून ते बंगलोर येथे इस्त्रोच्या मुख्यालयात नोकरी करीत आहेत.
गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज येथील मूळचे रहिवासी असलेले पराते यांचे प्राथमिक शिक्षण तिथेच झाले. त्यानंतर १९९५-९६ मध्ये त्यांनी गोंदियाच्या मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक शाखेत प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांच्यासाठी महाविद्यालयीन खर्च भागविणेही कठीण होते असे त्यांच्या काही सहकाऱ्यांनी सांगितले. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ टाटा कन्सल्टन्सीमध्ये नोकरी केली. त्यानंतर त्यांची निवड अंतराळ संशोधन संस्थेत (इस्रोे) झाली. सध्या ते मंगळयान मोहिमेत कंट्रोल सिस्टीमचे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
इस्रोसारख्या महत्वाच्या संस्थेत नोकरी मिळविणाऱ्या ३९ वर्षांच्या या वैज्ञानिकाची गणना आज वरिष्ठ वैज्ञानिकांत होते. त्यांना तीन भाऊ व एक बहीण आहे. एक भाऊ अभियंता, एक शिक्षक तर एक भाऊ व्यापारी आहे. गोंदिया शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक खा.प्रफुल्ल पटेल, अध्यक्ष वर्षा पटेल, सचिव आ.राजेंद्र जैन यांनी या कामगिरीसाठी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)