गोंदिया रेल्वे स्थानक सौरऊर्जेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 01:40 PM2019-04-15T13:40:00+5:302019-04-15T13:43:49+5:30

शेतकरी आणि विविध खासगी उद्योजकांनी वीज बिलाच्या खर्चात बचत करण्यासाठी सौर ऊर्जेची निर्मिती करण्यास सुरूवात केली आहे. याच धर्तीवर रेल्वे विभागाने सुध्दा सौर ऊर्जा निमिर्ती करुन त्याचा वापर करण्यास सुरूवात केली आहे.

Gondia Railway Station is on Solar Power | गोंदिया रेल्वे स्थानक सौरऊर्जेवर

गोंदिया रेल्वे स्थानक सौरऊर्जेवर

Next
ठळक मुद्दे२७० केव्ही वीज निर्मिती विद्युत बिलाच्या खर्चात बचत

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शेतकरी आणि विविध खासगी उद्योजकांनी वीज बिलाच्या खर्चात बचत करण्यासाठी सौर ऊर्जेची निर्मिती करण्यास सुरूवात केली आहे. याच धर्तीवर रेल्वे विभागाने सुध्दा सौर ऊर्जा निमिर्ती करुन त्याचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. हावडा-मुंबई मार्गावरील सर्वच रेल्वे स्थानकावर हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. याची सुरूवात गोंदिया रेल्वे स्थानकावर करण्यात आली असून सध्या २७० केव्ही सौर ऊर्जा निर्मिती केली जात आहे.
गोंदिया रेल्वे स्थानकावरील सर्व विद्युत उपकरणे सध्या सौर ऊर्जेवर चालविली जात आहेत. यासाठी रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ३ व ४ व फलाट क्रमांक ५ आणि ६ वर सौर ऊर्जा निर्मितीसाठी एकूण ८८४ सौर पॅनल लावून २७० केव्ही सौर ऊर्जा निर्मिती केली जात आहे. एक पॅनलपासून ३२५ वॅट सौर ऊर्जा निर्माण केली जाते. यासाठी स्मार्ट इनवर्टर लावण्यात आले आहे. सौर ऊर्जेपासून तयारी वीज आधी इनवर्टरला पुरवठा केली जाते. यासाठी ५० केव्हीचे पाच आणि २० केव्हीचे १ इनवर्टर लावण्यात आले आहे. तसेच या ठिकाणाहून विजेचा पुरवठा करण्यासाठी डिस्ट्रीब्यूशन पॅनल लावण्यात आले आहे. या ठिकाणी एक मीटर लावण्यात आले असून येथून थेट वीजेचा पुरवठा केला जातो. प्राप्त माहितीनुसार गोंदिया रेल्वे स्थानकाला जेवढ्या विजेची गरज आहे. त्यापैकी ९० टक्के वीज निर्मिती सौर ऊर्जेपासून केली जात असल्याची माहिती आहे.गोंदिया रेल्वे स्थानकाला एकूण ३५० केव्ही विजेची गरज असून त्यापैकी २७० केव्ही वीज निमिर्ती ही सौर ऊर्जेपासून केली जात आहे. याशिवाय पार्सल आॅफिसच्या छतावर सुध्दा सौर पॅनल लावून ४० केव्ही स्वतंत्र वीज निर्मिती केली जात आहे. गोंदिया रेल्वे स्थानकाला गरज असलेल्या एकूण ३५० केव्ही विजेमध्ये पीट लाईन लाईन परिसरात उपयोग केल्या जाणाऱ्या विजेचा सुध्दा समावेश आहे.

सब स्टेशनमधून वीज पुरवठ्याचा प्रस्ताव
गोंदिया रेल्वे स्थानकाला चार सब स्टेशनच्या माध्यमातून विजेचा वापर केला जात आहे. रेल्वे स्थानकाला पीट लाईन परिसरातील सब स्टेशनवरुन विद्युत पुरवठा केला जात आहे. मात्र आता या चारही सब स्टेशनवर सौर ऊर्जेपासून तयार झालेली वीज रेल्वे स्थानकावर पोहचविण्याचा प्रस्ताव रेल्वे विभागाने महावितरणकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास या ठिकाणी लावलेले महावितरणचे विद्युत मीटर काढून त्या ठिकाणी सौर ऊर्जेचे मीटर लावण्यात येणार आहे.

सौर ऊर्जा प्लांट लावण्यासाठी खर्च नाही
सौर ऊर्जा प्लांटलावण्यासाठी रेल्वे विभागाला कुठलाही खर्च आला नाही. अजून पॉवर नावाच्या एका कंपनीने रेल्वे हा प्लांटं लावूृन दिला आहे. रेल्वे विभागाने केवळ जागा उपलब्ध करुन दिली. या प्लाँटच्या देखभाल दुरूस्तीचे काम सुध्दा सदर कंपनीच करणार असल्याची माहिती आहे.

सर्वच रेल्वे स्थानकावर प्रयोग
रेल्वे विभागाने सध्या प्रायोगिक तत्त्वावर काही रेल्वे स्थानकावर सौर ऊर्जा निर्मितीचा प्रयोग राबविण्यास सुरूवात केली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर सर्वच रेल्वे स्थानकावर सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती करुन महिन्याकाठी वीज बिलाच्या खर्चात मोठी बचत करण्यात येणार असल्याचे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अतिरिक्त विजेची विक्री
रेल्वे स्थानकावर सध्या २७० केव्ही वीज निर्मिती केली जात आहे. यात अजून वाढ होण्याची गरज आहे. रेल्वे स्थानकाला आवश्यक असलेल्या विजेव्यतिरिक्त शिल्लक राहणारी वीज ही महावितरणला विकता येणार आहे. यामुळे रेल्वे स्थानकाच्या उत्पन्नात भर पडणार आहे. विशेष म्हणजे सध्या रेल्वे महावितरणकडून ११ रुपये प्रती युनिट दराने वीेज खरेदी करीत आहे. तर सौर ऊर्जेपासून तयार होणारी वीज केवळ रेल्वे ४ ते ५ रुपये युनिटने पडत आहे. त्यामुळे रेल्वेला महिन्याकाठी मोठ्या प्रमाणात पैशाची बचत करणे शक्य होणार आहे.

Web Title: Gondia Railway Station is on Solar Power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे