हरित महाराष्ट्रात गोंदिया समृद्ध
By Admin | Updated: April 10, 2017 01:08 IST2017-04-10T01:08:48+5:302017-04-10T01:08:48+5:30
हरित महाराष्ट्र-समृद्ध महाराष्ट्रचा नारा राज्य सरकारने देत राज्यभर दोन कोटी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम १ ते ७ जुलैदरम्यान राबविला.

हरित महाराष्ट्रात गोंदिया समृद्ध
नरेश रहिले गोंदिया
हरित महाराष्ट्र-समृद्ध महाराष्ट्रचा नारा राज्य सरकारने देत राज्यभर दोन कोटी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम १ ते ७ जुलैदरम्यान राबविला. यात गोंदिया जिल्ह्याला ९ लाख ४७ हजार ३४३ रोपटे लावण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यामुळे वृक्षलागवडीसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली होती. १६ हजार ९१२ अधिकारी-कर्मचाऱ्यांसह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधींनी लावलेल्या ९ लाख ६३ हजार ६०० रोपट्यांपैकी ८ लाख ९६ हजार ३८३ रोपटे जीवंत असल्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला. ९३ टक्के रोपटे जीवंत असून हरित महाराष्ट्रात गोंदिया समृध्द होत आहे.
गोंदिया वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, वनविकास महामंडळ, नवेगांव-नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि इतर यंत्रणा मिळून हा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. वृक्ष लागवड करून मोकळे होणे हा नित्यक्रम राहू नये शासनाने सांगितल्यामुळे लावलेल्या रोपट्यांच्या संगोपनाची जबाबदारी संबजित यंत्रणानी घेतली. परिणामी गोंदिया जिल्ह्यात लावण्यात आलेल्या रोपट्यांपैकी ९३ टक्के रोपटे जगले आहेत. हरित महाराष्ट्र-समृद्ध महाराष्ट्र हा राज्य सरकारचा नारा गोंदियाने यशस्वी केला. वनमहोत्सव २०१६ अंतर्गत जिल्ह्यात ९ हजार ४७ हजार ३४३ वृक्ष लागवड करण्याचे उद्दीष्टे होती. परंतु उद्दीष्टांपेक्षा अधिक ९ लाख ६२ हजार ६०० रोपटे लावण्यात आले. ही लावलेली रोपटे जीवंत आहेत की मृत्यू पावली यासाठी महाराष्ट्राच्या विधान परिषदेत लोकप्रतिनिधींनी तारांकित प्रश्न उपस्थित करून माहिती मागविण्यात आली. त्यानुसार गोंदिया जिल्ह्याने १ जानेवारी २०१७ रोजी पाहणी केल्यामुळे लावण्यात आलेल्या रोपट्यांपैकी ८ लाख ९६ हजार ३८३ रोपटे जीवंत असून ६६ हजार २१७ रोपटे मृत पावल्याचे लक्षात आले. गोंदिया जिल्ह्याच्या ३ हजार ४१५ ठिकाणी शासनाच्या विविध विभाग व सामाजिक संघटनांच्या माध्यामातून रोपटे लावण्यात आले होते. ती रोपटे जीवंत ठेवण्यात गोंदिया जिल्हा यशस्वी राहीला आहे. वृक्ष संवर्धनात गोंदियाने मजल मारली आहे.
जलसंधारण व जलसंपदाची १०० टक्के रोपटी जिवंत
या उपक्रमाल लावलेली रोपटे जलसंधारण व जलसंपदा विभागाने लावलेली रोपटे १०० टक्के जीवंत आहेत. शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने लावलेले ६० टक्के, न्यायालयाने लावलेले ५९ टक्के रोपटे जीवंत राहीले. तर इतर सर्व विभागांची रोपटे ८० टक्यापेक्षा अधिक जीवंत आहेत.
जनजागृतीचे फलीत
जिल्ह्यात हा वृक्षलागवडीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ९ चित्ररथ काढण्यात आले. ९१ पथनाट्य, कलापथकाच्या माध्यामतून जनजागृती करून ३१८ सभा घेऊन प्रचार-प्रसार करण्यात आला होता. या जनजागृतीमुळे हरित महाराष्ट्र-समृद्ध महाराष्ट्र उपक्रमात गोंदियाने रोपटे जिवंत ठेवण्यात चांगले यश मिळवले आहे.