गोंदियात वृक्षारोपणचा फज्जा
By Admin | Updated: August 7, 2015 01:34 IST2015-08-07T01:34:39+5:302015-08-07T01:34:39+5:30
गोंदिया नगर पालिकेच्या वतीने तीन वर्षांसाठी राबविण्यात येत असलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत शहरात ८०० रोपट्यांची लागवड करण्यात आली.

गोंदियात वृक्षारोपणचा फज्जा
फक्त २०० रोपटे जिवंत : लागवड केलेले ६०० रोपटे झाले गायब
कपिल केकत गोंदिया
गोंदिया नगर पालिकेच्या वतीने तीन वर्षांसाठी राबविण्यात येत असलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत शहरात ८०० रोपट्यांची लागवड करण्यात आली. मात्र त्यातील फक्त २०० रोपटे जीवंत असल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. यातून नगर पालिका प्रशासनाची वृक्षारोपण कार्यक्रमातील उदासीनता स्पष्ट झाली आहे.
वृक्षारोपण कार्यक्रमासाठी गोंदियासह नागपूरच्या काही संस्थांकडून निविदा टाकण्यात आल्याची माहिती आहे. मात्र वृक्षारोपणाचा हा कंत्राट प्रवर्तक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेला देण्यात आला. या संस्थेचे सचिव प्रतीक अनिल भालेराव तर अध्यक्ष शारदा नारनवरे यांनी कंत्राट मिळवितानाही मोठी कसरत केल्याची चर्चा आहे. पण वृक्षारोपणाचे काम मात्र अपेक्षेप्रमाणे झाले नाही.
वाढते प्रदूषण ही शासनापुढे सर्वात गंभीर समस्या बनून उभी आहे. यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यावर खर्चासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. प्रदूषणाच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वृक्षारोपणाला प्राधान्य दिले जात आहे. शासकीय यंत्रणेपासून तर सामाजिक संस्थांनाही वृक्षारोपणाच्या या कामात समाविष्ट करण्याची शासनाची धडपड आहे. त्याअंतर्गत गोंदिया नगर पालिकेनेही शहरात वृक्षारोपणाचा आणि त्या रोपट्यांच्या संगोपनाचा कंत्राट प्रवर्तक बहुउद्देशिय सामाजिक संस्थेला दिला होता.
वृक्षारोपणाच्या या कामासाठी नगर परिषदांना कार्यक्रम आखून देण्यात आला आहे. त्यानुसार शहरातील मोकळ््या जागेवर वृक्षारोपण करून शहर हिरवेगार करावयाचे आहे. मात्र गोंदिया नगर परिषदेने इथेही आपली उदासीनता दाखविली. न.प.कडून राबविण्यात येत असलेल्या तीन वर्षांच्या कार्यक्रमात कंत्राट देण्यात आलेल्या संस्थेने शहरातील भीमघाट परिसर, भीमनगर शाळा मैदान, आंबेडकर वॉर्ड, बौद्ध विहार, रिंग रोड, मोक्षधाम रोड, गणेशनगर शाळा, गोविंदपूर शाळा परिसरात आतापर्यंत फक्त ८०० रोपटी लावल्याचे सांगितले जात आहे. त्यातील ६०० रोपटी मरण पावली असून फक्त २०० रोपटी जीवंत असल्याची माहिती कार्यक्रम राबविणाऱ्या यंत्रणेकडून मिळाली आहे.
२८.५० लाखांचा वृक्षारोपण कार्यक्रम
या कार्यक्रमांतर्गत पालिकेकडून संस्थेला ५७० रूपये प्रतीरोपटे दिले जाणार आहे. ८०० रोपटे तीन वर्षे जगल्यास त्या वर्षे संस्थेला २८ लाख ५० हजार रूपये मिळू शकतात. मात्र संस्थेकडून केले जाणारे काम संशयास्पद ठरत आहे. फक्त २०० रोपटेच जीवंत असल्याने रोपट्यांचे संवर्धन कशा पद्धतीने होत आहे हे स्पष्ट होत आहे.
वृक्षारोपणाचा उद्देश वाऱ्यावर
पालिकेकडून तीन वर्षांसाठी वृक्षारोपण कार्यक्रम राबविला जात आहे. पाच हजार झाडे लावण्याचे उद्दीष्ट असलेल्या या कार्यक्रमासाठी २० जून २०१३ रोजी निविदा काढण्यात आली. त्याला ७ सप्टेंबर रोजी आमसभेची मंजूरी मिळाली. प्रवर्तक बहुउद्देशिय संस्थेला २० जानेवारी २०१४ रोजी वर्क आॅर्डर देण्यात आली.
वृक्षारोपण कार्यक्रमावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता कोरडे यांच्याकडे आहे. पण वृक्षारोपणाचा कार्यक्रम कधीपासून कधीपर्यंत राबविला जाणार आहे हे सांगणे त्यांना कठिण झाले आहे. शिवाय संस्थेने लावलेले ६०० रोपटे मरण पावले तर फक्त २०० रोपटे जीवंत असल्याची माहितीही या विभागाकडून मिळाली आहे. त्यामुळे वृक्षारोपणाचा खरा उद्देश किती साध्य झाला असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बगिचा प्रभाऱ्यांनी केली रोपट्यांची मागणी
विविध सामाजिक तसेच निसर्गप्रेमी संस्था व व्यक्तींच्या माध्यमातून शहरात वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतले जातात. अशात त्यांना सहज रोपटी उपलब्ध व्हावी या दृष्टीने येथील सुभाष बागेचे प्रभारी प्रवीण मिश्रा यांनी लागवड अधिकाऱ्यांकडे पाच हजार रोपट्यांची मागणी केली आहे. वनीकरण विभागाकडून रोपटी उपलब्ध झाल्यास संस्था किंवा ज्यांना रोपट्यांची गरज आहे त्यांना येथून रोपटी पुरविता येतील, असा त्यांचा यामागचा हेतू आहे.