गोंदियातील नाल्या ‘नो अपडेट’
By Admin | Updated: June 8, 2014 23:58 IST2014-06-08T23:58:33+5:302014-06-08T23:58:33+5:30
प्रशासनाच्या वतीने पावसाळा सुरू होण्यापूर्वी नियोजनपूर्व कामे करण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र या सूचनांचे पालन कितपत केले जाते याचे ताजे उदाहरण म्हणजे गोंदिया नगर परिषद आहे.

गोंदियातील नाल्या ‘नो अपडेट’
गोंदिया : प्रशासनाच्या वतीने पावसाळा सुरू होण्यापूर्वी नियोजनपूर्व कामे करण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र या सूचनांचे पालन कितपत केले जाते याचे ताजे उदाहरण म्हणजे गोंदिया नगर परिषद आहे. पावसाळ्याला सुरुवात होण्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना शहरातील नाल्या, गटारांची साफसफाई व पावसाळ्यापूर्वी नियोजनात्मक राबविण्यात येणारी कामे अद्यापही करण्यात आली नाही. त्यामुळे शहरवासीयांना समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
पावसाळ्यापुर्वी शहरातील नाल्या, गटारे ‘नो अपडेट’ आहेत,असे म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे. मात्र या समस्येकडे नगर प्रशासनाने दुर्लक्ष करीत आपल्या कानावर हात ठेवले आहे.
गोंदिया शहर आणि घाणीचे साम्राज्य यांचा जवळचा संबंध आहे. केरकचर्याची नियमित विल्हेवाट न लावणे, नाल्या, गटारे यांचा नियमित उपसा न होणे या सर्व बाबी आता शहरवासीयांकरिता नित्याच्याच झाल्या आहेत. खरे तर या सर्व गोष्टींची जबाबदारी नगर परिषदेची आहे. मात्र याच विभागाचे सध्या याकडे दुर्लक्ष झाले असल्याने शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यापुर्वी करण्यात येणार्या कामाचा आराखडा तयार करून ती कामे सुरू करण्यात येतात. मात्र गोंदिया नगर परिषदेने आराखडा तर तयार केला, मात्र प्रत्यक्षात कामाला अद्यापही सुरुवात केली नसल्याचे शहरात ठिकठिकाणी साचलेल्या घाणीवरून आणि नाल्यांमध्ये साचलेल्या गाळावरून दिसून येते.
शहरातील प्रत्येक वॉर्डात हे चित्र असून या घाणीच्या साम्राज्याने शहरवासी चांगलेच त्रस्त झाले आहेत. शहरातील वॉर्ड क्र. १ क्षमा बेकरी परिसरातील नाल्यामध्ये मोठय़ा प्रमाणात गाळ साचला आहे. या नाल्या केरकचर्याने तुडुंब भरल्या आहेत. रस्त्याच्या कडेलादेखील केरकचर्याचे ढिगारे पडले आहेत. बर्याच दिवसांपासून या केरकचर्याची विल्हेवाट लावण्यात आली नाही. त्यामुळे वॉर्डात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
याबाबत नागरिकांनी अनेकदा नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडे तक्रार केली. मात्र त्यांच्या तक्रारीला स्वच्छता विभागाच्या कर्मचार्यांनी केराची टोपली दाखविली आहे. वॉर्डातील केरकचर्याची विल्हेवाट लावण्याकरिता लोखंडी कंटेनर ठेवण्यात आले आहेत. मात्र केरकचर्याने कंटेनर भरल्यानंतर त्याची नियमित विल्हेवाट लावली जात नसल्याने हे कंटेनर केवळ शोभेची वस्तू ठरले आहेत. स्वच्छता विभागाचे अधिकारी तर वॉर्डात कधीच फिरकत नसून कागदावर मात्र सर्व व्यवस्थित असल्याचे दाखविले जात असल्याची माहिती आहे. एकंदरीत स्वच्छता विभागाच्या अधिकार्यांच्या दबंगशाहीमुळे शहरवासीयांना मात्र समस्येचा सामना करावा लागत आहे. नाल्यांमध्ये व रस्त्यांवर साचून असलेल्या कचर्यामुळे साथीच्या रोगांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील स्वच्छतेचा प्रश्नाला जेवढे नगर प्रशासन जबाबदार आहे, तेवढेच शहरातील नागरिकदेखील जबाबदार आहेत. कचरा कचरापेटीत न टाकता नाल्यांमध्ये व रस्त्यांवर टाकत असल्याने शहराच्या अस्वच्छेत भर पडली आहे. नागरिकांनीही काही गोष्टीचे पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छतेच्या मुद्यावर आपल्या कानावरचे हात केव्हा बाजूला करून कामाला सुरुवात करते, हे मात्र येणारा काळच सांगेल. (तालुका प्रतिनिधी)