गोंदिया न.प.च्या खरेदी पर्यवेक्षकाचा मनमर्जी कारभार

By Admin | Updated: March 9, 2016 02:52 IST2016-03-09T02:52:02+5:302016-03-09T02:52:02+5:30

नगर परिषदेच्या अतिमहत्वपूर्ण अशा खरेदी विभागात कार्यरत सहायक खरेदी पर्यवेक्षक नियमांना धुडकावून मनमर्जी कारभार करीत असल्याचे दिसून येत आहे.

Gondia Municipal Corporation's Supervisor's Managing Responsibility | गोंदिया न.प.च्या खरेदी पर्यवेक्षकाचा मनमर्जी कारभार

गोंदिया न.प.च्या खरेदी पर्यवेक्षकाचा मनमर्जी कारभार

दोन महिन्यांपासून सुटीवर : कामे खोळंबली तरी कारवाई शून्य
गोंदिया : नगर परिषदेच्या अतिमहत्वपूर्ण अशा खरेदी विभागात कार्यरत सहायक खरेदी पर्यवेक्षक नियमांना धुडकावून मनमर्जी कारभार करीत असल्याचे दिसून येत आहे. दोन जानेवारीपासून सुटीवर असलेल्या महोदयांनी सुटीवर गेल्यानंतर १५ दिवसांनी आपला अर्ज ‘ई-मेल’ केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे हा त्यांचा नेहमीचाच तोरा असून नगर परिषद प्रशासन मात्र काहीच कारवाई करीत नसल्याचे दिसते.
आपला मनमर्जी कारभार करीत असलेल्या या कर्मचाऱ्यावर पालिका प्रशासनाची मेहरबानी बघून कुठेतरी पाणी मुरत असल्याचे आता खुद्द नगर परिषदेच्या वर्तुळात बोलले जात आहे.
नगर परिषद कार्यालयातील साहित्य खरेदीसाठी करण्यासाठी एक विशेष विभागच आहे. या विभागामार्फतच पालिकेला लागणाऱ्या साहित्यांची खरेदी केली जाते. यात वर्षभराचे छापील साहित्य, फर्निचर व इतर साहित्यांचा यात समावेश होतो. आता या सर्व साहित्यांसाठी निविदा मागविण्याची ही वेळ आहे. असे असताना मात्र विभागाचे सहायक पर्यवेक्षक प्रदीप खोब्रागडे २ जानेवारीपासून वैद्यकीय रजेवर गेले असल्याची माहिती आहे.
यातही त्यांचा मोठेपणा असा की, सुटीवर गेल्याच्या १५ दिवसानंतर त्यांनी आपला अर्ज मेलवर पाठविला आहे. एवढेच नव्हे तर डिसेंबर महिन्यातही ते दोन-चार दिवसच कामावर गेले असल्याचे कळले. तर सन २०१४-१५ मध्येही ते जानेवारी ते मार्चपर्यंत सुट्टीवर गेले होते असे सांगितले जाते.
आपल्या मनमर्जीप्रकारे खोब्रागडेंचा कारभार सुरू असल्याने नगर परिषदेची कामे खोळंबली आहेत. याचा दैनंदिन कामांवरही परिणाम होत आहे. खोब्रांगडेसह अन्य काही कर्मचारीही आपल्या मर्जीनेच कारभार करीत असल्याचीही माहिती आहे. मात्र खोब्रागडेंनी यात हद्दच पार केली असल्याचे दिसत येते. तरीही पालिका प्रशासनाकडून खोब्रागडेंवर काहीच कारवाई करण्यात आली नसल्याचे दिसते. एका कर्मचाऱ्यावर पालिका प्रशासनाची मेहरबानी बघून अन्य कर्मचारी आता यात काहीतरी गोलमाल असल्याचेही बोलू लागले आहेत. या प्रकरणावर मुख्याधिकारी गुणवंत वाहूरवाघ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद आढळला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Gondia Municipal Corporation's Supervisor's Managing Responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.