गोंदिया मेडिकल कॉलेजला मिळणार १०० जागा
By Admin | Updated: June 15, 2016 02:20 IST2016-06-15T02:20:13+5:302016-06-15T02:20:13+5:30
प्रस्तावित गोंदिया मेडिकल कॉलेजसाठी राज्य शासनाने १०० जागा मंजूर केल्या आहेत. उच्च न्यायालयानेही कॉलेज सुरू करण्यासंदर्भात अनुकूल मतप्रदर्शन केले आहे.

गोंदिया मेडिकल कॉलेजला मिळणार १०० जागा
नाना पटोले : एमसीआयच्या परवानगीनंतरच सुरू होणार
गोंदिया : प्रस्तावित गोंदिया मेडिकल कॉलेजसाठी राज्य शासनाने १०० जागा मंजूर केल्या आहेत. उच्च न्यायालयानेही कॉलेज सुरू करण्यासंदर्भात अनुकूल मतप्रदर्शन केले आहे. त्यासंदर्भात येत्या १६ जूनला अंतिम सुनावणीही आहे. मात्र हे कॉलेज एमसीआयच्या परवानगीशिवाय सुरू होणार नाही, असे सांगून कोणी राजकीय लोकांनी एकट्याने हे क्रेडिट घेऊ नये, असा टोला खासदार नाना पटोले यांनी लावला.
गोंदियात मंगळवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत खा.पटोले यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, काही लोक होर्र्डिंग्ज लावून मेडिकल कॉलेजचे क्रेडिट लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र मेडिकल कॉलेजला अंतिम मंजुरी मिळालेली नाही. कॉलेजला एमसीआयची मंजुरी मिळण्यासाठी लागणाऱ्या सुविधा पूर्ण करण्यासाठी मी खासदार झाल्यानंतर जमीन खरेदी करण्यापासून पुढील प्रक्रिया सुरू झाली. मधल्या काळात कॉलेजसाठी लागणाऱ्या बेसिक गोष्टी तयार करण्याकडे कोणी लक्ष दिले नाही. मात्र क्रेडिट घेण्यासाठी पुढे येत आहेत. हे कोणाचे एकाचे क्रेडिट नसून सर्वांचेच क्रेडिट असल्याचे ते म्हणाले.
गोंदियातील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक तज्ज्ञ डॉक्टरांच्या जागा अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्याकडे खा.पटोले यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ही परीस्थिती केवळ गोंदियाच नाही तर संपूर्ण देशभर आहे. त्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांचे सभागृहात लक्ष वेधले होते. मात्र आरोग्यमंत्र्यांनी त्या मुद्द्याला बगल दिली. ही परिस्थिती बदलण्यासाठी सिस्टीममध्येच बदल करावा लागेल, असे खा.पटोले म्हणाले.
गोंदिया शहरातील वाढत्या वीज समस्येवर उपाय म्हणून राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ८ महिन्यांपूर्वीच शहरासाठी अंडरग्राऊंड केबल सिस्टम मंजूर केली होती. मात्र त्याचे काय झाले, याबाबत विचारले असता पटोले यांनी अधीक्षक अभियंत्यांना फोन करून माहिती घेतली. या कामाचा प्रस्ताव आता वीज कंपनीकडून सरकारला दिला जात असल्याचे त्यांना सांगण्यात आले. प्रस्तावित मेडिकल कॉलेजमधील फर्निचर घोटाळा, शहरातील बहुतांश मोठी कामे सुपर कन्स्ट्रक्शन या एकाच कंपनीला देण्याचा प्रकार अशा अनेक मुद्द्यांवर पत्रकारांना खासदारांना छेडले. मात्र त्याबाबत पुरेशी माहिती नसून माहिती घेतो असे ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेतील युतीचा निर्णय २४ ला
गेल्या काही महिन्यातील घडामोडी आणि त्यातून ताणले गेलेले भाजप व काँग्रेसमधील संबंध पाहता जिल्हा परिषदेत असलेली काँग्रेस-भाजपा युती कायम ठेवायची किंवा नाही याबाबत पक्षात विचारविनिमय झाला आहे. काही वरिष्ठ लोक या मुद्द्यांवरून मुख्यमंत्र्यांनाही भेटले. त्यांनी तुमच्या स्तरावर निर्णय घ्या, असे सांगितल्याचे खा.पटोले म्हणाले. त्यामुळे येत्या २४ जूनला अर्जुनी मोरगावमध्ये पक्षाची जिल्हास्तरिय बैठक होणार असून त्यात जिल्हा परिषदेतील भाजप-काँग्रेस युतीसंदर्भातील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. या युतीबद्दल आपले वैयक्तिक मत विचारले असता ही युती अयोग्यच आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
धानाच्या भाववाढीवर समाधानी नाही
केंद्र सरकारने पुन्हा धानाला ६० रुपये भाववाढ दिली यावर बोलताना खा.पटोले म्हणाले ही भाववाढ समाधानकारक निश्चितच नाही. परंतू शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीचा योग्य मोबदला देण्यासाठी कृषी पीक विमा योजनेत बराच बदल केला आहे. आता ३३ टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार आहे. शिवाय विम्याची फक्त २ टक्के रक्कम शेतकऱ्याला भरायची असून ९८ टक्के रक्कम सरकार भरणार असल्याचे ते म्हणाले.