सचिन, हिराणींना घातली गोंदियाने भुरळ
By Admin | Updated: February 11, 2015 01:27 IST2015-02-11T01:27:39+5:302015-02-11T01:27:39+5:30
गोंदिया-भंडारा जिल्ह्यासाठी शिक्षणाची दारे उघडणारे मनोहरभाई पटेल यांचा जयंती उत्सव दरवर्षी होणाऱ्या विविध ‘सेलीब्रेटींच्या’ आगमनामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे.

सचिन, हिराणींना घातली गोंदियाने भुरळ
गोंदिया : गोंदिया-भंडारा जिल्ह्यासाठी शिक्षणाची दारे उघडणारे मनोहरभाई पटेल यांचा जयंती उत्सव दरवर्षी होणाऱ्या विविध ‘सेलीब्रेटींच्या’ आगमनामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. यावर्षी समस्त भारतीयांच्या लाडक्या सचिनला पाहण्याची आणी त्याचे अनुभव ऐकण्याची संधी मिळाल्याने यावर्षीचा सोहळा गोदियावासीयांसाठी अविस्मरणीय ठरला आहे. याच बरोबर सचिन आणि चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिराणींनाही गोंदियाने भुरळ घातल्याचे चित्र पहायला मिळाले.
गोंदिया सारख्या राज्याच्या एका टोकावर वसलेल्या आणि नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल तथा मागास म्हणून गणल्या जाणाऱ्या गोंदियाला मोठ्या सेलीब्रेटंीचे पाय लागने हे सहज शक्य नाही. पण खा. प्रफुल्ल पटेल यांनी शब्द टाकावा आणि तो कुणी नाकारावा हे शक्य नसते. यावेळीही सचिनच्या बाबतीत हाच अनुभव सर्वांना आला. ज्या सचिनला हजारोवेळा केवळ टीव्ही स्क्रीनवर पाहिले त्या सचिनला प्रत्यक्ष आपल्यासमोर बसलेले पाहणे आणि नंतर सचिनने त्याच्या आयुष्यातील अनेक प्रसंग गोंदियावासीयांसोबत ‘शेअर’ करणे हा अनुभव त्या सोहळ्याला उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील अविष्मरणीय क्षण ठरला आहे. यावेळी हजारो चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाने सचिनही भारावून गेल्याचे दिसून आले.
गोंदिया सारख्या छोट्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या पटेल यांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा परसिर पाहून सचिन ने असे कॉलेज चित्रपटांमध्येच बघायला मिळत असल्याची भावना व्यक्त केली. पुढच्या जन्मी अशाच कॉलेजमध्ये शिकण्याची संधी आपणाला मिळावी असेही तो म्हणाला. बिरसी येथील फ्लार्इंग अॅकेडमीला त्याने भेट दिली. तेव्हा गोंदिया सारख्या ठिकाणी हे सर्व असल्याचे पाहून आश्चर्य व्यक्त केले.
अनेक गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक हिरानी यांनीही पटेलांचे अभियांत्रिकी कॉलेज आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध मॉडेल्स पाहून जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याचे सांगितले. कमी गुणांमुळे मला अभियांत्रिकीत प्रवेश मिळू शकला नाही. पण आज किमान अशा कॉलेजमध्ये काही क्षण वावरल्याचे समाधान लाभल्याचे ते म्हणाले.
खा. पटेल यावेळी म्हणाले माझ्या वडीलांनी त्याकाळी गोंदिया-भंडारा जिल्ह्यासाठी जी शिक्षणाची सोय करून दिली त्यात नवनवीन अभ्यासक्रमांची भर घालून येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर जाण्याची गरज पडू नये अशी व्यवस्था केली.
यामागे पैसे कमविणे हा आमचा हेतू नाही. जिल्ह्यासाठी काही करू शकलो याचे समाधान हीच आमची कमाई असल्याचे ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)