सरकारविरोधी मोर्चाने गोंदिया दणाणले

By Admin | Updated: May 22, 2015 01:53 IST2015-05-22T01:53:47+5:302015-05-22T01:53:47+5:30

‘धानाला भाव मिळालाच पाहीजे, सातबारा कोरा करो- वर्ना कुर्सी खाली करो, केंद्र सरकार मुर्दाबाद, प्रफुल्ल पटेल आप संघर्ष करो, हम तुमारे साथ है’

Gondia grows on anti-government fronts | सरकारविरोधी मोर्चाने गोंदिया दणाणले

सरकारविरोधी मोर्चाने गोंदिया दणाणले

गोंदिया : ‘धानाला भाव मिळालाच पाहीजे, सातबारा कोरा करो- वर्ना कुर्सी खाली करो, केंद्र सरकार मुर्दाबाद, प्रफुल्ल पटेल आप संघर्ष करो, हम तुमारे साथ है’ अशा विविध घोषणा देत राष्ट्रवावादी काँग्रेसने काढलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाने गुरूवारी गोंदिया शहर दणाणून सोडले.
खा.प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात भर दुपारच्या उन्हा निघालेल्या या भव्य मोर्चाने गोंदियावासीयांचे लक्ष वेधून घेतले. दुपारी ३ वाजताच्या सुमारास सुभाष शाळेच्या मैदानावरून निघालेला हा मोर्चा शहराच्या मुख्य मार्गावरून घोषणा देत नेहरू चौकातून नवीन उड्डाण पुलाखालील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला त्या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
यावेळी खा.पटेल यांनी युपीए सरकारमधील आपल्या कार्यकाळाची नवीन सरकारच्या कार्यकाळाची तुलना करताना गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील विकासकामांकडे कसे दुर्लक्ष होत आहे हे उघड केले. मी आतापर्यंत शांत होतो. कारण त्यांना काम करण्याची संधी द्यायची होती. पण एक वर्ष झाले तरी त्यांनी काहीही केले नाही. दम असेल तर एखादा अदानीसारखा मोठा उद्योग आणून दाखवा, असे आव्हानही त्यांनी दिले. पण तो आणणे तर दूर, भंडारा जिल्ह्यात मंजूर करून आणलेला भेलचा कारखानाही सुरू करू शकले नाही, असे टोला त्यांनी लावला. प्रस्तावित मेडिकल कॉलेजचे काम थंडबस्त्यात आहे. अदानीची वीज २.६४ रुपये दराने राज्य सरकार विकत घेऊन तिप्पट दराने नागरिकांना देत आहे. हेच अच्छे दिन आहे का? असा प्रश्न करून त्यांनी नागरिकांना जागरूक होण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी आ.दिलीप बन्सोड यांनी भाजप सरकारने धानाची निर्यात बंद केल्याने धानाचे भाव पडले. क्रिमीलेयरची अट ६ लाख होती ती ४ लाखावर आणली. ओबीसी स्कॉलरशिपचा निर्णय अद्याप घेतला नाही. शेवटी नागरिकांच्या उज्वल भविष्यासाठी प्रफुल्ल पटेलांचेच सक्षम नेतृत्व पाहीजे, अशी पुष्टी त्यांनी जोडली. जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर म्हणाले, भाजप सरकार खोटारडे आहे. घोषणा आणि वादे करण्यापलिकडे त्यांनी काहीही केलेले नाही. एकाही घोषणेची पूर्तता सरकारने केलेली नाही. आता निवडणुका पाहून बोनस देण्याची घोषणा केली पण त्याचा लाभ कोणाला होणार, कसा होणार हे काहीही स्पष्ट केले नाही. अशा फसव्या घोषणेला बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आ.राजेंद्र जैन, नरेश माहेश्वरी, राकाँचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे यांनीही मार्गदर्शन केले. मोर्चात केवळ बघेले, मनोहर चंद्रीकापुरे, पंचम बिसेन, शिव शर्मा, डॉ.सुशिल रहांगडाले यांच्यासह ठिकठिकाणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले. कार्यक्रमाचे संचालन गंगाधर परशुरामकर यांनी केले.
या मोर्चाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कल्पना दिली होती. मात्र मोर्चाचा धसका घेऊन त्यांना मुंबईत बोलविण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे त्यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी राव यांनी निवेदन स्वीकारले. या निवेदनात एकूण २४ मागण्या करण्यात आल्या.
(जिल्हा प्रतिनिधी)
मोर्चाची क्षणचित्रे
मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी स्वत: अधिकारी बाहेर येत नाही तोपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका खा.प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव यांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारले.
मोर्चात सहभागी काही बैलबंड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अग्रस्थानी असलेल्या बैलबंडीवर खा.पटेल स्वत: स्वार होते. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला होता.
दुपारच्या कडक उन्हाच्या झळा लागत असतानाही मोर्चात सहभागी झालेले शेतकरी, महिला विनातक्रार शिस्तबद्धरित्या मार्गक्रमण करीत होते.
दुपारी ४.१५ वाजता मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर पोहोचला. मोर्चाने संपूर्ण बालाघाट रस्ता व्यापून टाकल्याने दिड तासपर्यंत वाहतूक खोळंबली होती. संपूर्ण सभा संपेपर्यंत कोणीही जागेवरून हलले नाही.

Web Title: Gondia grows on anti-government fronts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.