गोंदिया व तिरोडा आगाराला मिळणार २५ लाखांचे उत्पन्न
By Admin | Updated: October 7, 2014 23:35 IST2014-10-07T23:35:31+5:302014-10-07T23:35:31+5:30
जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी प्रशासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या बसेससोबत करार केला आहे. चार विधानसभा मतदार संघात परिवहन महामंडळाचे तिरोडा व गोंदिया

गोंदिया व तिरोडा आगाराला मिळणार २५ लाखांचे उत्पन्न
गोंदिया : जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी प्रशासनाने राज्य परिवहन महामंडळाच्या बसेससोबत करार केला आहे. चार विधानसभा मतदार संघात परिवहन महामंडळाचे तिरोडा व गोंदिया हे दोन आगार आहेत. तिरोडा आगारातील ६० व गोंदिया आगारातील ६४ अशा एकूण १२४ बसेस निवडणुकीच्या कामात धावणार आहेत. त्यासाठी या दोन्ही आगारांना करारातून २५ लाख रूपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
एरवी राज्य परिवहन महामंडळाला नेहमी तोटाच सहन करावा लागतो. मात्र या निवडणूक कराराच्या माध्यमातून एसटी महामंडळाला संजीवनी मिळणार आहे. १४ व १५ आॅक्टोबर रोजी सदर १२४ बसेस निवडणुकीच्या कामासाठी धावणार असल्याने जवळपास ४०० पेक्षा अधिक फेऱ्या इतर ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्रात एकूण ३०५ मतदान केंद्रे राहणार आहेत. तिरोडा विधानसभा मतदार क्षेत्रात २८८, गोंदियात ३३५ तर आमगाव विधानसभा क्षेत्रात ३०२ मतदान केंद्रे आहेत. निवडणूक कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी १२८ झोन तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी १२८ झोनल अधिकारी राहणार आहेत. याबरोबरच १५ राखीव झोनल अधिकारी, एक हजार ३५५ मतदान केंद्राध्यक्ष, एक हजार ३५५ मतदान अधिकारी, एक हजार ३५५ राखीव मतदान अधिकारी असे पाच हजार ५६३ कर्मचारी, सुरक्षा यंत्रणेतील कर्मचारी भरारी पथके यासह निवडणूक साहित्य-सामुग्री व ईव्हीएम मशीन्सची सुरक्षित वाहतूक करण्यासाठी प्रशासनाने शासकीय वाहनांसह एसटी आगारातील बसेस करारबद्ध केल्या आहेत.
देवरी विधानसभा क्षेत्रासाठी गोंदिया आगारातून ३१ बसेसचा करार झाला आहे. गोंदिया विधानसभा क्षेत्रासाठी ३३ बसगाड्या १४ व १५ आॅक्टोबर रोजी धावणार आहेत. दोन्ही दिवस आगाराच्या बसेस निवडणूक करारात व्यस्त असल्याने गोंदिया आगाराच्या अडीचशेवर फेऱ्या रद्द होणार आहेत. दरम्यान बसेसचा तुटवडा भासणार असून प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडणार आहे.
गोंदिया आगाराला देवरी व आमगाव क्षेत्रासाठी ६४ बसगाड्यांच्या करारातून प्रतिबस १४ हजार ५०० रूपये नुसार जवळपास १८ लाख ५६ हजार रूपयांचे उत्पन्न मिळणार आहे. तिरोडा विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीसाठी तिरोडा आगारातील १४ आॅक्टोबर रोजी ३० व १५ आॅक्टोबर रोजी ३० अशा ६० बसेस धावणार आहेत. या करारातून तिरोडा आगाराला दोन दिवसात अंदाजे सहा लाख ५० हजार रूपयांचे उत्पन्न मिळेल. परंतु जवळपास १६० फेऱ्या रद्द होणार आहेत. दोन्ही आगारांचा विचार केल्यास एसटी महामंडळाला २५ लाखपेक्षाही अधिक उत्पन्न या करारातून मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यानही महामंडळाला उत्पन्न मिळाले. आता पुन्हा २५ लाखापेक्षा अधिक उत्पन्न मिळणार असल्याने तोट्यातून सावरण्यासाठी हा करार एसटी महामंडळाला लाभदायी ठरणार आहे. (प्रतिनिधी)