दोन दिवसांत गोंदिया व तिरोडा आगाराच्या ५२४ फेऱ्या झाल्या रद्द
By Admin | Updated: October 16, 2014 23:26 IST2014-10-16T23:26:20+5:302014-10-16T23:26:20+5:30
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी मनुष्यबळ व मशीन्स मतदान केंद्रांवर पोहचविण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या गोंदिया व तिरोडा आगारातील एकूण ९४ बसेस करारबद्ध करण्यात आल्या.

दोन दिवसांत गोंदिया व तिरोडा आगाराच्या ५२४ फेऱ्या झाल्या रद्द
गोंदिया : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी मनुष्यबळ व मशीन्स मतदान केंद्रांवर पोहचविण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या गोंदिया व तिरोडा आगारातील एकूण ९४ बसेस करारबद्ध करण्यात आल्या. त्यामुळे १४ व १५ आॅक्टोबर या दोन दिवसांत दोन्ही आगारांतील बसेसच्या एकूण ५२४ फेऱ्या रद्द झाल्या. या प्रकारामुळे एसटी महामंडळाला लाभ झाला असला तरी सामान्य प्रवाशांची मात्र मोठीच गैरसोय झाली आहे.
निवडणूक कामाचे पेमेंट विलंबाने मिळत असल्यामुळे आधी पेमेंट करा तेव्हाच बसेस पुरवू, अशी भूमिका गोंदिया आगाराने घेतली होती. मात्र निवडणूक विभागाने अग्रीम रक्कम देण्याचे मान्य केल्यावर गोंदिया आगाराने बसेस पुरविण्याचे मान्य केले. यात गोंदिया उपविभागासाठी ३३ बसेस गोंदिया आगारातून १४ व १५ आॅक्टोबर या दोन्ही दिवसांसाठी करारबद्ध करण्यात आल्या आहेत. म्हणजे १४ आॅक्टोबरला ३३ व १५ आॅक्टोबरला ३३ बसेस निवडणुकीच्या कामासाठी धावणार आहेत. तर देवरी उपविभागासाठी ३१ बसेस करारबद्ध करण्यात आल्या आहेत. १४ व १५ आॅक्टोबर या दोन्ही दिवशी प्रत्येकी सदर ३१-३१ निवडणूक कामासाठी धावणार आहेत.
गोंदिया आगारातून गोंदिया उपविभागासाठी पुरविण्यात आलेल्या ३३ बसेसमध्ये भंडारा आगाराच्या सहा मीडी बसेस, तुमसर आगाराच्या दोन मीडी बसेस तर गोंदिया आगाराच्या दोन मीडी व २३ मोठ्या बसेसचा समावेश आहे. तसेच गोंदिया आगारातूनच देवरी उपविभागासाठी पुरविण्यात आलेल्या ३१ बसेसमध्ये २६ गोंदिया आगाराच्या व पाच साकोली आगाराच्या बसेसचा समावेश आहे. त्यामुळे या दोन दिवसात गोंदिया आगाराच्या एकूण ३६४ बसफेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. तिरोडा विभागासाठी तिरोडा आगाराच्या ३० बसेस दोन दिवसांसाठी करारबद्ध करण्यात आल्या आहेत. ३० बसेस १४ आॅक्टोबर व ३० बसेस १५ आॅक्टोबर रोजी निवडणुकीच्या कामासाठी धावणार आहेत. त्यामुळे तिरोडा आगाराच्या या दोन दिवसांत एकूण १६० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
तिरोडा व गोंदिया दोन्ही आगाराच्या सदर बसेस १४ व १५ आॅक्टोबर रोजी निवडणुकीच्या कामात असल्यामुळे दोन्ही आगारांच्या एकूण ५२४ बसफेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे इतरत्र जाणाऱ्या प्रवाशांना कमालीची गैरसोय झाली. (प्र्रतिनिधी)