उज्ज्वला गॅस योजनेच्या यादीत गोलमाल
By Admin | Updated: July 29, 2016 01:48 IST2016-07-29T01:48:11+5:302016-07-29T01:48:11+5:30
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या बोगस याद्यांचे वाटप गावागावांत होत आहे.

उज्ज्वला गॅस योजनेच्या यादीत गोलमाल
दिलीप बन्सोड यांचा आरोप : राष्ट्रवादी काँग्रेस करणार तीव्र आंदोलन
गोंदिया : प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या बोगस याद्यांचे वाटप गावागावांत होत आहे. या याद्यांमध्ये अनेक मृतांसह जे व्यक्ती गावात जन्मलेच नाही व ज्यांना कधी पाहण्यातच आले नाही, अशाही व्यक्तींची नावे आहेत. तर एकाच यादीमध्ये एकाच व्यक्तीचे नाव तीनतीनदा आले आहे. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना याद्या कोठून उपलब्ध झाल्या याबाबत माहिती नाही. त्यामुळे उज्वला गॅस कनेक्शन योजनेत भोंगळ कारभार सुरू असल्याचा आरोप माजी आमदार दिलीप बंसोड यांनी केला आहे. यावर जिल्हा प्रशासनाने ठोस पाऊल उचलून १५ आॅगस्टपर्यंत कारवाई करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून सत्ताधारी भाजपकडून चालविण्यात येणारा हा गोरखधंदा चव्हाट्यावर आणेल, असा इशाराही त्यांन पत्र परिषदेत दिला आहे.
बन्सोड म्हणाले, तिरोडा व गोरेगाव तालुक्यांच्या अनेक गावात बोगस याद्या वितरित केल्या जात आहेत. प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा लाभ देण्यासाठी सदर याद्या वाटप केल्या जात असल्याची माहिती मिळाली असता अनेक गावांच्या याद्या मिळवून घेतल्या व तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेतली. दरम्यान सदर दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यांना याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. तहसीलदारांनी तिरोडा येथील सांकेशा गॅस एजंसीच्या संचालिकेची विचारपूस केली असता सदर याद्या त्यांना शासकीय कार्यालयातून मिळाल्या असल्याचे व याद्या स्थानिक आमदारांकडे पोहोचवून आमदारांनुसार लाभार्थ्यांची निवड करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे एजंसी संचालकांनी सांगितले.
या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी यांना भेटून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. असता त्यांनाही याबाबत काहीही माहिती नव्हती. त्यांच्याकडून कोणत्याही याद्या पाठविण्यात आल्या नाही, तसेच याबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना त्यांना उपलब्ध झाल्या नाहीत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे बंसोड यांनी सांगीतले.
सदर याद्या केवळ भाजपच्या कार्यकर्त्यांकडेच उपलब्ध आहेत. केवळ भाजपच्या कार्यकर्त्यांनाच या योजनेचा लाभ देण्यासाठीच षडयंत्रपूर्ण प्रयत्न असू शकते, अशी शंका व्यक्त केली जात आहे. सदर याद्यांवर त्या जारी करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या नाहीत. या योजनेचा लाभ कोणाला द्यावा, याबाबत कोणत्याही प्रकारच्या मार्गदर्शक सूचना त्यात नमूद करण्यात आल्या नाहीत. या बोगस याद्या असून त्यात मृतांच्या नावांसह केवळ भाजपच्याच कार्यकर्ता व मतदारांची नावे आहेत. यात दारिद्र रेषेखालील लोकांचीसुद्धा नावे नाहीत. शिवाय या याद्या ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध नसून गावातील भाजप कार्यकर्त्याच्या नावेच सदर याद्या पाठविण्यात आल्या आहेत.
सदर याद्यांच्या आधारावर लाभार्थ्यांची निवड करण्यात येवू नये. या बोगस याद्या त्वरित रद्द करण्यात याव्यात. गॅस एजंसींना पत्र देवून प्रक्रिया थांबविण्यात यावी. शासकीय अधिकृत यादी तयार करण्यात यावी व त्या यादीच्या आधारावरच लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी. यात तहसीलदार व जिल्हाधिकारी यांनी मध्यस्थी रहावे. जर असे करण्यात आले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस हा मुद्दा उचलून धरेल.
त्यासाठी १५ आॅगस्टपूर्वी प्रशासनाने योग्य पाऊल उचलावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी जि.प. सदस्य मनोज डोंगरे, जि.प. सदस्य सुरेश हर्षे व माजी पं.स. सदस्य डुमेश चौरागडे उपस्थित होते.(प्रतिनिधी)
हा गोविंद चतरे कोण व कुठला ?
तिरोडा तालुक्याच्या सिल्ली येथील यादीत गोविंद चतरेचे नाव आहे. परंतु या नावाचा व्यक्ती न या गावात जन्माला आला आणि न कधी या गावात राहिला. गावातील कोणताही व्यक्ती या नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही. तरीसुद्धा त्याचे नाव यादीत कसे? सिल्ली गावाच्या यादीत ३५ नावे असे आहेत की ज्यांना गावातील कोणताही व्यक्ती ओळखत नाही. पत्र परिषदेत उपस्थित चौरागडे यांनी, त्यांच्या गावातील पहिल्या ५० लोकांच्या यादीतील ३० लोकांजवळ आधीपासूनच गॅस कनेक्शन आहे, मग त्या लोकांची नावे का देण्यात आली? असा प्रश्न उपस्थित केला.