गोंदियातील देवी-देवता पडद्याआड
By Admin | Updated: April 5, 2015 01:20 IST2015-04-05T01:20:39+5:302015-04-05T01:20:39+5:30
शनिवारी (दि.४) दुपारी लागलेल्या चंद्रग्रहणामुळे गोंदिया शहरातील सर्व मंदिरांमधील देवी-देवतांना सकाळपासून पडद्याआड करण्यात आल्याचे चित्र सर्व मंदिरांत बघावयास मिळाले.

गोंदियातील देवी-देवता पडद्याआड
गोंदिया : शनिवारी (दि.४) दुपारी लागलेल्या चंद्रग्रहणामुळे गोंदिया शहरातील सर्व मंदिरांमधील देवी-देवतांना सकाळपासून पडद्याआड करण्यात आल्याचे चित्र सर्व मंदिरांत बघावयास मिळाले. विशेष म्हणजे शनिवारीच हनुमान जयंती होती. मात्र ग्रहणामुळे सकाळी ६.३० वाजतापाच मंदिर बंद करण्यात आले. त्यामुळे जयंती असूनही भाविकांना हनुमंताचे दर्शन घेता आले नाही. अनेक मंदिरांत हा जयंती उत्सव शनिवारऐवजी दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी साजरा करण्यात येणार आहे.
शहरातील सिव्हील लाईन्स हनुमान चौकातील प्रसिद्ध हनुमान मंदिरासह शहरातील अन्य हनुमान मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्साहाने जयंती उत्सवाचे आयोजन केले जाते. यावेळी भाविकांची एकच गर्दी उसळते. सोबतच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र यंदा जयंतीच्या दिवशीच शनिवारी (दि.४) चंद्रग्रहण आले. यात सकाळी ६.४५ वाजता सुतक लागले तर दुपारी ३.४६ वाजता ग्रहण लागले.
ग्रहणात देवतांच्या पूजनाचा निषेध असून फक्त भजन, कीर्तन, ध्यान व स्मरण करता येते. त्यामुळेच सर्व देवी-देवतांचे मंदिर बंद ठेवण्यात आले असून देवी-देवता पडद्याआड करण्यात आल्या आहेत, असे पुजाऱ्यांनी सांगितले. शहरातील प्रत्येक मंदिर बंद दिसून आले. मूर्ती दिसू नये यासाठी गाभारा पडद्याने झाकण्यात आल्याचेही दिसले. हे ग्रहण सायंकाळी ७.१५ वाजता सुटणार असून त्यानंतर मुर्तीला स्नान, पूजन व आरती करून दर्शनासाठी मंदिर उघडले जातील, असे सांगण्यात आले.(शहर प्रतिनिधी)