बेरोजगारांच्या हाताला काम द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST2021-07-07T04:35:54+5:302021-07-07T04:35:54+5:30
बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी केशोरी : येथील बसस्थानक परिसरातील जागेत खासगी व्यावसायिकांनी दुकाने थाटून शासकीय जागेवर अतिक्रमण केल्यामुळे ...

बेरोजगारांच्या हाताला काम द्या
बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी
केशोरी : येथील बसस्थानक परिसरातील जागेत खासगी व्यावसायिकांनी दुकाने थाटून शासकीय जागेवर अतिक्रमण केल्यामुळे परिवहन मंडळाच्या बसेसला परत फिरविण्यासाठी जागा शिल्लक राहत नसल्याने बसस्थानकावर वाहतुकीची कोंडी होत आहे. येथील ग्रामपंचायत प्रशासन दुकानदारांचे हित जोपासून अतिक्रमण हटविण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अतिक्रमण हटविण्याची मागणी होत आहे.
अर्धवट बांधकामाचा बसतोय फटका
गोरेगाव : गोंदिया-बल्लारशा रेल्वेमार्गावर फाटक नसलेल्या ठिकाणी अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यातच अपुऱ्या मनुष्यबळ अभावी रेल्वेमार्गावर फाटक उभारण्यास अडचणी निर्माण होत असल्याने रेल्वे विभागाकडून मागील १० ते १५ वर्षांपूर्वी अनेक रेल्वे मार्गांवर बोगद्याचे काम सुरू आहे ; पण हे काम अजूनही पूर्ण झाले नसल्याने याचा शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
व्यायामशाळा उभारण्याची मागणी
सालेकसा : तालुक्यातील काही गावात व्यायामशाळा नसल्याने युवकांना अडचण जात आहे. त्यामुळे व्यायामशाळा मंजूर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. तालुक्यातील अनेक गावात ग्रामपंचायतींच्या माध्यमातून व्यायामशाळा निर्माण झाल्या आहेत. मात्र, अजूनही काही गावात व्यायामशाळा नाहीत. यावर्षी कोरोनामुळे व्यायाम केंद्रावर निर्बंध आले आहेत. मात्र, भविष्यात गावातील युवकांना व्यायाम करण्यासाठी सोपे होईल.
ग्रामीण भागातील रस्ते डांबरीकरणाविना
गोंदिया : जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते बांधकाम केले जाते ; मात्र अनेक गावांना जोडणारे रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे. यावर्षीच्या पावसाने तर शहरी तसेच ग्रामीण रस्त्यांची वाट लागली आहे. रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी अनेकदा लाेकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांकडे करण्यात येते ; मात्र रस्ता दुरुस्तीस टाळाटाळ केली जाते.
दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर
गोंदिया : येथील रेल्वेस्थानक लगत प्रभू रोडवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. कित्येकदा त्यातून दुर्गंधीसुद्धा पसरते. त्यामुळे या परिसरात घाणच घाण पसरून दुर्गंधीयुक्त वातावरण तयार होते.
कामगारांची योजना पूर्ववत सुरू करा
गोंदिया : कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम करणाऱ्या मजुरांना थेट पाच हजार रुपये देण्याची योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणी कामगारांकडून होत आहे.
वृक्षतोडीनंतर वृक्षांची सर्रास वाहतूक
अर्जुनी-मोरगाव : शेतशिवारासह जंगलात असलेल्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड सुरू झाली आहे. अशी वृक्षतोड करताना वनविभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे.
महिलांना जनधनच्या मानधनाची प्रतीक्षा
गोरेगाव : गरीब महिलांना आर्थिक बळ म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत महिलांच्या जनधन बचत खात्यात अनुदान जमा केले होते. मात्र, आता अनुदान जमा झालेले नाही.
ग्रामीण भागात माकडांचा आतंक
पांढरी : सध्या सगळीकडे शेतीची कामे सुरू आहेत. शेतात नागरिकांची उपस्थिती असल्यामुळे माकडांनी गावाकडे धाव घेतली आहे. ते गावात येऊन घर व भाज्यांचे नुकसान करीत आहेत.
शेती कामात यंत्राच्या वापरामुळे शेतमजुरांची उपासमार
केशोरी : मागील वर्षीपासून कोरोना, विषाणूच्या दहशतीखाली प्रत्येक नागरिक दिसून येत आहे. यामुळे सर्व नागरिकांचे आर्थिक व्यवहार विस्कटले आहेत. असे असले तरी ही शेतीच्या मशागतीचे कामे मोठ्या प्रमाणात सुरु असून मात्र शेतीची पूर्ण मशागत ही यंत्राच्या सहाय्याने होत असल्यामुळे मनुष्यबळ कमी लागत आहे. परिणामी शेतमजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.