ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्या

By Admin | Updated: September 10, 2015 02:15 IST2015-09-10T02:15:22+5:302015-09-10T02:15:22+5:30

आदिवासी व नक्षलग्र्रस्त तालुका म्हणून गणल्या जाणाऱ्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात आजघडीला ग्रामीण भागातील सर्वसामान्य...

Give rural hospital status to sub district hospital | ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्या

ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्या

डोंगरवार यांची मागणी : अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा पुरवठा करा
बोंडगावदेवी : आदिवासी व नक्षलग्र्रस्त तालुका म्हणून गणल्या जाणाऱ्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात आजघडीला ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेशी निगडित असलेली आरोग्य सेवा सर्वत्र कोलमडलेल्या अवस्थेत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी झरपडा येथील सामाजिक कार्यकर्ते व तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष डॉ. गजानन डोंगरवार यांनी केली आहे.
दीड लाखांच्या वर लोकसंख्या असलेल्या तालुक्यात सद्यस्थितीत नवेगावबांध व अर्जुनी-मोरगाव या दोन ठिकाणी ग्रामीण रुग्णालये आहेत. आदिवासी तालुका असलेल्या अर्जुनी-मोरगाव येथे सामान्य व गोरगरीब कुटुंबांचे सर्वाधिक वास्तव्य आहे. बदलत्या हवामानानुसार तालुक्यात रोगराईचे प्रमाणसुध्दा वाढत आहे. महागडा औषधोपचार करणे सामान्य जनतेच्या ऐपतीबाहेरचा आहे.
तालुक्याच्या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षांपासून ३० खाटांचा ग्रामीण रुग्णालय देखण्या ईमारतीमध्ये सुरू आहे. दिवसें-दिवस रुग्णालयात येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दिवसाकाठी २०० च्या जवळपास बाह्यरुग्णांची तपासणी केली जात असल्याचे सांगण्यात आले. मात्र तालुका स्तरावरील ग्रामीण रुग्णालयात आवश्यक सोयी तसेच यंत्रसामुग्री उपलब्ध नसल्याने अनेकदा रुग्णांना प्राथमिक औषधोपचार करून बाहेर ठिकाणी हलविण्याचा सल्ला देण्यात येत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गजानन डोंगरवार यांनी सांगितले.
हलाखीच्या जीवनात सामान्य गोरगरीब जनतेला खासगी औषधोपचार करणे शक्य नाही. शासनाच्या वतीने विविध आरोग्य सेवा मोफत असल्या तरी तालुक्यातील सर्वसामान्य दारिद्र्य रेषेच्या खाली जीवन जगणाऱ्या कुटुंबाला शासनाच्या आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र तालुक्यात दिसत असल्याची खंत डॉ. डोंगरवार यांनी व्यक्त केली.
आजघडीला तालुक्याच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात बऱ्याच गैरसोयीचा दिसत आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव असल्याने तालुक्यातील जनतेला पाहिजे त्या प्रमाणात आरोग्य सेवेचा लाभ मिळत नाही. आदिवासी भागातील जनतेला आरोग्य सेवा तत्परतेने मिळून सर्व रोग्यांचे निराकरण होण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर उपजिल्हा रुग्णालयात करून खाटांची मर्यादा वाढवावी, तज्ञ डॉक्टरांचा भरणा करण्यात यावा, सोनोग्राफी, सीटीस्कॅन, रक्त तपासणी चाचण्यासंबंधीच्या उपकरणांची पूर्तता करण्यात यावी, अशी मागणी तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष डॉ. गजानन डोंगरवार यांनी केली. (वार्ताहर)

Web Title: Give rural hospital status to sub district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.