पूर्ण वीज द्या, अन्यथा बंद करा
By Admin | Updated: April 25, 2017 00:46 IST2017-04-25T00:46:08+5:302017-04-25T00:46:08+5:30
विजेच्या कमी दाबामुळे पिकांचे होत असलेले नुकसान व विद्युत विभागाला वारंवार निवेदन देऊनसुध्दा अधिकाऱ्यांना जाग येत नसल्याने...

पूर्ण वीज द्या, अन्यथा बंद करा
शेतकऱ्यांचा घेराव : देवरीत महावितरणपुढे धरणे आंदोलन
देवरी : विजेच्या कमी दाबामुळे पिकांचे होत असलेले नुकसान व विद्युत विभागाला वारंवार निवेदन देऊनसुध्दा अधिकाऱ्यांना जाग येत नसल्याने शेंडा परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारला विद्युत विभागाच्या उपविभागीय कार्यालयाचा घेरात करीत आठ तासांपासून धरणे आंदोलन केले. मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत एकाही कर्मचाऱ्याला कार्यालयाबाहेर जाऊ न देण्याची कठोर भूमिका घेतली. सायंकाळी सदर वृत्त लिहीपर्यंत शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरूच होते.
सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी रबीचे पीक घेत असतात. शेतीमध्ये धान, ऊस, केळी व भाजीपाला मोठ्या प्रमाणात आहे. जर वीज १५ दिवस मिळाली नाही तर संपूर्ण शेती संपुष्टात येईल. वीजेचा कमी दाब असल्याने मोटार पंप चालू होत नाहीत. त्यामुळे शेतीला पाणी द्यायचे कसे? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. शेतकरी पूर्णपणे हतबल झाला असून व विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहे.
संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी विद्युत कार्यालयावर धरणे आंदोलन करीत विद्युत विभाग मुर्दाबादचे नारे लावले. ११ पासून तर सायंकाळी ७ पर्यंत आंदोलन सुरूच होते. देवरीचे ठाणेदार राजेश तटकरे यांनी आंदोलनकर्त्यांची समजुत घालण्याचा प्रयत्न केला तर परंतु शेतकऱ्यांनी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, अशी भूमीका घेतली होती.
अनेक कर्मचारी व अधिकारी वीज कार्यालयात होते. आंदोलनकर्त्यानी कार्यालयाच्या दारावरच ठिय्या आंदोलन मांडले होते. विद्युत विभागाचे काही कर्मचारी शेंडा परिसरात विजेची पाहणी करायला गेल्याचे सांगण्यात आले.
मोर्चाचे नेतृत्व जि.प.सदस्य सरीता कापगते, देवानंद गहाणे, पवन टेकाम, पं.स.सदस्य गणेश सोनबोईर, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष राजेश चांदेवार, नासीक दसरीया व शेकडो शेतकऱ्यांनी केले. (शहर प्रतिनिधी)
अशा आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या
कार्यालयाचा घेराव करीत आंदोलनकर्त्यानी सहायक कार्यकारी अभियंता पी.व्ही.वाघमारे यांना निवेदन देऊन त्वरीत उच्च क्षमतेच्या दाबाचा विद्युत पुरवठा सुरळीत करणे व झालेल्या नुकसानीची पाहणी करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.
शेतकऱ्याचे वीजबील पूर्णत: माफ करण्यात यावे, शेतकऱ्यांना येणारे वीज बिल रीडींग घेऊन देण्यात यावे, या मागणीचे निवेदन देण्यात आले. कार्यकारी अभियंता एस.एम.वाकडे हे गैरहजर असल्याने उपकार्यकारी अभियंता वाघमारे यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्विकारले.