कर्तव्यदक्ष व नियमित मुख्याध्यापक द्या
By Admin | Updated: July 23, 2016 02:18 IST2016-07-23T02:18:33+5:302016-07-23T02:18:33+5:30
आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त देवरी तालुक्यातील कोसबी (खुर्द) येथील जि.प. प्राथमिक शाळेत त्वरित कर्तव्यदक्ष

कर्तव्यदक्ष व नियमित मुख्याध्यापक द्या
व्यवस्थापन समिती व पालकांची मागणी : पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा इशारा
देवरी : आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त देवरी तालुक्यातील कोसबी (खुर्द) येथील जि.प. प्राथमिक शाळेत त्वरित कर्तव्यदक्ष व नियमित मुख्यध्यापकाची पूर्तता करण्यात यावी, या आशयाचे निवेदन कोसबी (खुर्द) येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जि.प.चे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना दिले आहे.
सदर निवेदनाच्या प्रतिलिपी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावाडे, मुंबई शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, पुणेच्या शिक्षण विभागाचे संचालक डॉ. पुरुषोत्तम भापकर आणि नागपूर शिक्षण विभागाचे सहायक संचालक ए.व्ही. पारधी यांना पाठविण्यात आली आहे. कोसबी (खुर्द) शाळेत नियमित मुख्याध्यापकाची पूर्तता त्वरित करावी, अशी मागणी त्यात केली आहे. तसेच सदर मागणी २४ जुलैपर्यंत पूर्ण न झाल्यास २५ जुलै २०१६ पासून आम्ही पालकवर्ग आपल्या पाल्य विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाही, असा इशारा निवेदनातून दिला आहे.
आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त देवरी तालुक्यातील कोसबी (खुर्द) येथील जि.प. प्राथमिक शाळेची पटसंख्या ४६ आहे. येथे नियमाप्रमाणे दोन शिक्षक कार्यरत आहेत. यात मुख्याध्यापक पदावर एच.ए. मुंगलमारे आणि सहायक शिक्षक पदावर कुंभरे यांचा समावेश आहे. परंतु मुख्याध्यापक मुंगुलमारे हे दररोज शालेय वेळेत दारुच्या नशेत शाळेत येतात. त्यामुळे त्यांना मागच्या वर्षीपासून अर्धांगवायू आजाराने पछाडले आहे. ते आता फक्त आपल्या हजेरी रजिस्टरवर सही करण्याकरिता शाळेत येत असून विद्यार्थ्यांना शिकवित नाही. त्यामुळे याचा विपरित परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर होऊन ते ज्ञानार्जनात मागे पडत आहेत.
एकीकडे शासनकर्ते सहावर्षावरील विद्यार्थ्यांना शक्तीचे शिक्षण देण्याकरिता वाजागाजा करीत आहेत. तर दुसरीकडे कोसबी (खुर्द) शाळेतील विकासाकडे लक्ष देत नाही. प्राथमिक शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील पाया असते. त्यामुळे मागच्या वर्षी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रल्हाद दुधनाग यांच्या अध्यक्षतेखाली अनेकवेळा बैठक घेवून चर्चा करण्यात आली. चर्चा केल्यानंतर देवरी पं.स.चे गटशिक्षणाधिकारी किशोर भांडारकर यांना वारंवार लेखी निवेदन देवून सदर शाळेतील अर्धांगवायू आजाराने ग्रस्त मुख्याध्यापकाची बदली इतरत्र करुन या शाळेत कर्तव्यदक्ष व नियमित मुख्याध्यापकाची पूर्तता करण्याची मागणी केली होती. परंतु त्यांनी या गंभीर समस्येकडे अद्याप लक्ष दिले नाही. उलट त्यांनी शाळा व्यवस्थापन समितीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकाराने संतापून आता कोसबी (खुर्द) येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रल्हाद दुधनाग, उपाध्यक्ष लखनलाल दुधकवर, ग्रा.पं. सदस्य शिवचरण साहळा, सदस्य मनोहर भोंगारे, चैनसिंग गंगाकचूर, भुनेश्वरी करईबाग, ज्योती जाता, पूनम दुधकावरा, शारदा नेताम, कला पोरेटी, सरिता फजेरी आणि म्हैसुलीचे सामाजिक कार्यकर्ता ईश्वर कोल्हारे आदींच्या शिष्टमंडळाद्वारे गोंदिया जि.प.चे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना निवेदन देवून कोसबी (खुर्द) शाळेतील मुख्याध्यापक एच.ए. मुगुलमारे यांच्यावर निलंबनाची कारवाई करुन त्यांना पंचायत समितीमध्येच कार्यरत ठेवावे आणि त्यांच्या जागी कर्तव्यदक्ष नियमित मुख्याध्यापकाची त्वरित पूर्तता करावी, अशी मागणी केली आहे.
जर सदर मागणी २४ जुलैपर्यंत पूर्ण न झाल्यास २५ जुलैपासून कोसबी (खुर्द) शाळेचे पालकवर्ग आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणार नाही, असा इशारासुद्धा या निवेदनाद्वारे दिला आहे. (प्रतिनिधी)