१५ टक्के कमिशन द्या

By Admin | Updated: February 13, 2015 01:18 IST2015-02-13T01:18:43+5:302015-02-13T01:18:43+5:30

आपल्या विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार व केरोसिन विक्रेत्यांनी मंगळवार (दि.१०) आपली दुकान बंद ठेवून मोर्चा काढला.

Give 15 percent commissions | १५ टक्के कमिशन द्या

१५ टक्के कमिशन द्या

सालेकसा/तिरोडा : आपल्या विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार व केरोसिन विक्रेत्यांनी मंगळवार (दि.१०) आपली दुकान बंद ठेवून मोर्चा काढला. तसेच मुख्यमंत्री तसेच अन्न व पुरवठा मंत्र्यांना पाठविण्यासाठी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले.
सालेकसा तालुका नक्षलग्रस्त, आदिवासी व अतिसंवेदनशील तालुका म्हणून शासनाच्या रेकॉर्डला नोंद आहे. त्या अनुषंगाने येथे कार्यरत सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना १५ टक्के नक्षलग्रस्त भत्ता देण्यात येतो. गडचिरोली जिल्ह्यात शासकीय कर्मचाऱ्यांसोबतच स्वस्त धान्य दुकानदारांनासुध्दा १५ टक्के कमिशन देण्यात येते. परंतु सालेकसा तालुक्यातील रेशन दुकानदारांंना हा लाभ मिळत नाही. सदर लाभ देण्याची मागणी रेशन वितरण दुकानदार संघ सालेकसाच्या वतीने करण्यात आली आहे. एक दिवसासाठी आपली दुकाने बंद ठेवून तहसील कार्यालय सालेकसा येथे एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी गोंदिया यांना सालेकसाच्या तहसीलदारांमार्फत निवेदन सादर करण्यात आले.
रेशन दुकानदारांनी इतरही काही प्रमुख मागण्या सादर केल्या आहेत. त्यात बीपीएल व अन्न सुरक्षा योजनेच्या शिधापत्रिका धारकांना अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिका धारकाप्रमाणे ३५ किलो धान्य दरमहा देण्यात यावे, केशरी कार्ड धारकांना प्रति कार्ड २० किलो तांदूळ व ५ किलो गहू देण्यात यावे, सर्वांना रेशनचा अधिकार देण्यात यावे, रोख अनुदान न देता रॉकेल, धान्य, गॅससह सर्व जीवनोपयोगी वस्तुंचा पुरवठा रेशन दुकानदारांमार्फत करण्यात यावे, साखरेवरील कमिशन वाढवावे, रेशन दुकानदारांना इतर राज्याप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावे, रेशन वाटपात दोन कर्मचाऱ्यांचा विचार करण्यात यावा, महागाईचा विचार करीत घरभाडे, विद्युत खर्च, वाहतूक खर्च व कमिशन वाढ करण्यात यावी आदी मागण्याचा समावेश आहे.
निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष रामाजी गावराने, उपाध्यक्ष धनराज बनोठे, सचिव खेमराज साखरे, रमेश रहांगडाले, महेंद्र कापसे, मुरलीधर बावने, काशीराम बहेकार, प्रतिभा परिहार, मोहन राठी, तुकाराम बोहरे आदींचा समावेश होता.
तिरोडा : तालुका स्वस्त धान्य व केरोसिन विक्रेता परवाना संघटनेच्या वतीने तिरोडा काँग्रेस भवनातून मोर्चा काढण्यात आला.
यात तालुक्यातील २५० स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारकांचा सहभाग होता. शासनाच्या विरूद्ध नारेबाजी व घोषणा देत सदर मोर्चा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पोहचला व तेथे सभा घेण्यात आली.
या वेळी संघटनेचे अध्यक्ष माणिकराव डोंगरे, उपाध्यक्ष शोभेलाल दहीकर, सचिव हेमराज अंबुले यांनी कार्डधारक व रेशन दुकानदारांवर शासन कसे अन्याय करीत आहे, याबाबत मार्गदर्शन केले. यानंतर उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना मुख्यमंत्री तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांना पाठविण्यासाठी संघटनेच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Give 15 percent commissions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.