प्रेयसी घरात शिरल्याने दोन गटांत मारहाण
By Admin | Updated: March 18, 2017 01:47 IST2017-03-18T01:47:18+5:302017-03-18T01:47:18+5:30
गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बोरगाव येथील मनोज चचाने याची प्रेयसी त्याच्या घरात घुसल्याने त्याचे ज्या मुलीशी लग्न जुळले होते

प्रेयसी घरात शिरल्याने दोन गटांत मारहाण
नवीन नाते वांद्यात : बोरगाव येथील घटना
गोरेगाव : गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बोरगाव येथील मनोज चचाने याची प्रेयसी त्याच्या घरात घुसल्याने त्याचे ज्या मुलीशी लग्न जुळले होते त्या मुलीच्या नातेवाईकांनी त्याच्या घरी येऊन गोंधळ घातला. परिणामी दोन्ही गटांनी एकमेकांना मारहाण केल्याची घटना गुरुवारच्या सकाळी १०.३० वाजता घडली. या संदर्भात १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरेगाव तालुक्याच्या बोरगाव येथील आरोपी मनोज हेमराज चचाने याचे लग्न चिचगावटोला येथील एका मुलीशी जुळले होते. परंतु त्याचे प्रेमसंबंध दुसऱ्या मुलीशी होते. ती मुलगी त्याच्या घरात घुसली. ही माहिती मनोजची सोयरीक झालेल्या लोकांना माहित पडल्यावर ते लोक बोरगाव येथे गुरुवारी सकाळी १०.३० वाजता आले. यात दोन्ही गटात हाणामारी झाली.
विनोद सोनवाने (२७) रा.चिचगाव यांच्या तक्रारीवरुन आरोपी मनोज हेमराज चचाने (२१), सुरेंद्र चरण पटले (२९), देवेंद्र बाबुलाल राऊत (३०), पुस्तकला शामा राऊत (३३) व सुग्रता चरण पटले (४५) रा. बोरगाव यांच्यावर भादंविच्या कलम १४३,१४७, १४९, ३२४, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर सुरेंद्र चरण पटले (२९) यांच्या तक्रारीवरुन आरोपी विनोद मुन्नीलाल सोनवाने (२७), मनोज प्रेमलाल सोनवाने (२८), कन्हैया सोमा पटले (३२). गुणीलाल चुन्नीलाल सोनवाने, रेखा गुणीलाल सोनवाने (४५) सर्व रा. चिचगावटोला यांच्या विरुद्ध भादंविच्या कलम १४३, १४७, १४९, ३२४, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांना काठ्यांनी मारले.