लाईफ लाईनला दीड हजार रूग्णांची भेट
By Admin | Updated: May 16, 2016 01:57 IST2016-05-16T01:57:11+5:302016-05-16T01:57:11+5:30
आरोग्य सेवा देण्यासाठी शहरात आलेल्या लाईफ लाईन एक्स्प्रेसला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे.

लाईफ लाईनला दीड हजार रूग्णांची भेट
उन्हातही प्रतिसाद : १७ पासून कान व दातांची नोंदणी
गोंदिया : आरोग्य सेवा देण्यासाठी शहरात आलेल्या लाईफ लाईन एक्स्प्रेसला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. रखरखत्या उन्हातही रूग्ण उपचार करवून घेण्यासाठी येत असून यातूनच आतापर्यंत दीड हजार रूग्णांनी एक्स्प्रेसला भेट दिली आहे. येत्या २५ मेपर्यंत लाईफ लाईन एक्स्प्रेस येथे राहणार आहे.
गोंदियात आलेल्या लाईफ लाईन एक्स्प्रेसमध्ये मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी १२०९ लोकांनी नोंदणी केली होती. त्यानुसार १९३ लोकांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. ९० मिरगीच्या रूग्णांची तपासणी करून त्यांना सल्ला देण्यात आला. अपंगाच्या ११९ नोंदणी झाल्या असून ओष्ठव्यंग असलेल्या १८ ची तर हाड तुटलेल्या, वाकलेल्या १८ लोकांची शस्त्रक्रियेसाठी निवड झाली आहे.
सोयीनुसार अपंगांना कॅलिपर्स वाटप करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक प्रकारच्या रूग्णांसाठी बाहेरील तज्ज्ञ डॉक्टरांची चमू आलेली आहे. कानाच्या पडद्याच्या शस्त्रक्रिया व दातांची तपासणी करण्यासाठी १७ मे पासून नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणी व शस्त्रक्रिया २५ मेपर्यंत करण्यात येणार आहे. ओष्ठव्यंगाच्या शस्त्रक्रियेसाठी लखनऊ येथील पाच डॉक्टरांची चमू, मिरगीसाठी मुंबई येथील डॉक्टर व डोळ्यासाठी डॉ. धर्मेंद्रसिंग आले आहेत. कानाच्या रूग्णांची तपासणी केल्यानंतर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कानाची मशीनही रूग्णांना दिली जाणार आहे. दातांच्या रूग्णांची तपासणी करून रूग्णांच्या गरजेनुसार दातांमध्ये सिमेंट भरणे, स्केलिंग करणे, दात उपटण्याचे काम केले याणार आहे.