सावकारांच्या तावडीतून सोडवा

By Admin | Updated: August 22, 2016 00:17 IST2016-08-22T00:17:37+5:302016-08-22T00:17:37+5:30

गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम, आदिवासी व नक्षलग्रस्त देवरी तालुक्यातील जवळपास ५ हजारावर शेतकऱ्यांनी सावकारांकडून कर्ज घेतले आहे.

Get rid of lenders | सावकारांच्या तावडीतून सोडवा

सावकारांच्या तावडीतून सोडवा

काँग्रेसचे निवेदन : पाच हजार शेतकऱ्यांनी घेतले सावकारांकडून कर्ज
देवरी : गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम, आदिवासी व नक्षलग्रस्त देवरी तालुक्यातील जवळपास ५ हजारावर शेतकऱ्यांनी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. अशा लोकांचे कर्जमाफीचे प्रकरण जिल्हास्तरीय समितीकडे रेंगाळलेले आहे. वरुन सावकारांनी कर्जदार शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीचा तगादा लावल्याने येथील शेतकरी अडचणीत आहेत. या गंभीर बाबीकडे जिल्हा उपनिबंधक डोळेछाक करीत आहे.सदर प्रकरण मार्गी लावून दोषी सावकार आणि संबंधीत अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी या संबंधात देवरी तालुका काँग्रेस कमिटीने निवेदन दिले आहे.
महाराष्ट्रात सावकाराच्या कर्जापोटी आत्महत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याला आळा घालण्याकरिता शासनाने सावकारी कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना कार्यान्वित केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी सावकारांकडे सोने किंवा जमीन तारण ठेवून कर्ज घेतले आहे अशा शेतकऱ्यांचे कर्ज शासनाद्वारे भरुन देणार असल्याचे शासनाने जाहीर केले. त्यानुसार सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची यादी शासनाद्वारे मागविण्यात आली होती. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी आता सावकारांपासून कर्जमुक्ती मिळेल या अपेक्षेने कर्जाची रक्कम भरली नाही. त्यामुळे त्यांना वर्षभराने व्याज त्यांच्यावर बसले आहे.
मागील दोन महिन्यांपासून येथील शेतकरी संस्था निबंधक कार्यालय देवरी, जिल्हा उपनिबंधक गोंदिया, जिल्हाधिकारी गोंदिया आणि लोकप्रतिनिधीकडे वारंवार चकरा मारीत आहेत.
यात संस्था निबंधक कार्यालय आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी फक्त यांना खोटे आश्वासने देवून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत.
कर्जमाफीच्या प्रकरण येत्या दहा दिवसात निकाली काढावे असे निवेदनात म्हटले आहे. या आशयाचे निवेदन शुक्रवार (दि.१९) ला मुख्यमंत्री व जिल्हा उपनिबंधक कार्यालय गोंदिया यांचे नावे देवरीचे उपविभागीय अधिकारी यांचे प्रतिनिधी नायब तहसीलदार डी.के. गुरनुले आणि सहकार अधिकारी श्रेणी- १ देवरी यांच्या मार्फत गोंदिया जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आले. दहा दिवसात येथील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ न मिळाल्यास काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल असा इशारा निवेदनातून दिला आहे.
निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात तालुका काँग्रेस अध्यक्ष, संदीप भाटीया, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे, जि.प.सदस्य माधुरी कुंभरे, पं.स. उपसभापती संगिता भेलावे, उपाध्यक्ष चैनसिंग मडावी, माजी पं.स. सदस्य सोनू नेताम, अ‍ॅड. प्रशांत संगीडवार, माजी सरपंच धनपत भोयर, वरिष्ठ कार्यकर्ता बळीराम कोटवार, जीवन सलामे, मोहन कुंभरे, युवक काँग्रेस अध्यक्ष शकील कुरेशी, अविनाश टेंभरे, घनशाम फरकुंडे, टी.जी. वाघमारे, एस.जी. बळगाये, एन.एफ. धुर्वे, राजेश गहाणे, रामचरण गावडकर, गणेश भेलावे, तेजराम घासले, राकेश बहेकार, सुरेंद्र बन्सोड, मानिकबापू आचले, प्रेम उंदिरवाडे, यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)

फक्त ४०४ शेतकऱ्यांचीच यादी
देवरी तालुक्यातील चार सावकारांपैकी तीन सावकारांनी शासनाची फसवणूक करीत तालुक्यात जवळपास ५ हजार कर्जदार शेतकरी असताना बोटावर मोजल्या इतके म्हणजे ४०४ शेतकऱ्यांची यादी संबंधित विभागाकडे सादर केली. त्यापैकी ३५४ लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला तालुकास्तरीय समितीने पात्र ठरवून सदर प्रस्ताव ३१ मार्चच्या आधीच जिल्हास्तरीय समितीकडे सादर केले. परंतु या जिल्हास्तरीय समितीने ३५४ प्रस्तावांना अद्याप मंजूरी दिली नाही. त्यामुळे पात्र ३५४ प्रस्ताव आणि जी प्रकरणे सावकारांनी संबंधित विभागाकडे सादर केले नाही अशा सर्व कर्जदार शेतकऱ्यांना अद्याप शासनाकडून कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.

Web Title: Get rid of lenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.