बालकल्याण सभापतींचे राकाँ सदस्यांना ‘गेट आऊट’
By Admin | Updated: September 9, 2016 01:53 IST2016-09-09T01:53:06+5:302016-09-09T01:53:06+5:30
जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एखादे प्रकरण चर्चेला आणल्यास त्याचे निराकरण न करता सदस्याला अपमानास्पद वागणूक देण्याचा प्रकार घडत आहे.

बालकल्याण सभापतींचे राकाँ सदस्यांना ‘गेट आऊट’
सदस्यांत असंतोष : पदाचा दुरूपयोग केल्याचा आरोप
गोंदिया : जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एखादे प्रकरण चर्चेला आणल्यास त्याचे निराकरण न करता सदस्याला अपमानास्पद वागणूक देण्याचा प्रकार घडत आहे. यातून गुरूवारी महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीमध्ये सभापती विमल नागपुरे यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समिती सदस्य खुशबू जितेश टेंभरे, ललिता चौरागडे, सुनिता मडावी यांना बैठकीतून ‘गेट आऊट’ म्हणून सभेबाहेर जाण्याचे निर्देश दिले. या प्रकारामुळे सदस्यांमध्ये चांगलाच असंतोष पसरला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या समिती सदस्यांनी गैरकारभाराचा पाढा वाचून सभागृह सोडले व संबंधित सभापतीवर पदाचा दुरूपयोग केल्याप्रकरणी तातडीने कारवाई करावी अशी लेखी तक्रार आयुक्त नागपूर विभाग यांच्याकडे केली. या प्रकाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समिती सदस्य खुशबू जितेश टेंभरे, ललिता चौरागडे, सुनिता मडावी यांनी केली आहे.
महिला बालकल्याण समितीची बैठक दुपारी १ वाजता आयोजित केली होती. परंतु सदर बैठक ठरल्याप्रमाणे १ वाजता न घेता सकाळी ११ वाजता सभापती विमल नागपुरे यांच्या कक्षात घेण्यात येत असल्याचे दुरध्वनीवरून कळविण्यात आले. सभेची कार्यवाही सुरू होताच समिती सदस्य खुशबू टेंभरे यांनी वेळ बदलण्याचे कारण आणि नोटीसमधील नमुना अ जोडपत्रात उल्लेखीत करण्यात आलेल्या काम काजाबाबत समितीचे सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंबादे यांना काही प्रश्नांचे उत्तर मागितले. मात्र त्याचे उत्तर मिळण्यापूर्वीच सभापती नागपुरे यांनी सदस्यांंना तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही असे म्हणून ‘गेट आऊट’ म्हटले. यावर सदस्यांनी आमच्या अधिकारावर तुम्ही गदा आणू शकत नाही, असे सांगून कारभारावर ताशेरे ओढले व बैठकीतून बहिर्गमन केले.
मागील सर्वसाधारण सभेमध्ये खुशबू टेंभरे यांनी व इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला सदस्यांनी आलमारी व इतर साहित्य खरीदी करण्यासाठी आलेला निधीबाबत विचारणा केली होती, तेव्हापासून सभापती नागपुरे यांनी सदस्यांचा राग धरल्याचे म्हटले जाते. याबाबत त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. (जिल्हा प्रतिनिधी)