‘कचरागाडी’ बनल्या जनजागृतीचे माध्यम
By Admin | Updated: October 3, 2016 01:30 IST2016-10-03T01:30:14+5:302016-10-03T01:30:14+5:30
नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या भरवशावर शहर स्वच्छ होणार नसून प्रत्येकाचा यासाठी सहभाग आवश्यक आहे.

‘कचरागाडी’ बनल्या जनजागृतीचे माध्यम
गाड्यांना लावले ‘म्युझिक सिस्टम’ : स्वच्छता जनजागृतीसाठी पालिकेचा प्रयोग
कपिल केकत गोंदिया
नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या भरवशावर शहर स्वच्छ होणार नसून प्रत्येकाचा यासाठी सहभाग आवश्यक आहे. करिता शहरवासीयांत जाणीव व उत्साह निर्माण करीत जनजागृती व्हावी या उद्देशातून नगर परिषदेने आपल्या कचरागाडींना ‘म्युझिक सिस्टम’ लावले आहेत. स्वच्छतेचा संदेश देणारी गीते या ‘म्युझिक सिस्टम’वर सुरू असतात. नगर परिषदेच्या या नव्या प्रयोगाचे शहरवासीयांकडून कौतूक होत असल्याचेही दिसून आले.
आपला परिसर स्वच्छ असावा या उद्देशातून स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेवर भर दिला जात आहे. महात्मा गांधींच्या जयंतीचे निमित्त साधून देशात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह सामाजीक संघटना, शाळा-महाविद्यालय व सामान्य नागरिकांचा सहभाग लाभत आहे. या स्वच्छता अभियानांतर्गत नगर परिषदेक डून २६ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर दरम्यान स्वच्छता आठवडाही साजरा करण्यात आला.
दरम्यान स्वच्छचा अभियानाचे हे दुसरे वर्ष असल्याने यंदाही रविवारी (दि.२) नगर परिषदेच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विशेष म्हणजे स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे हे नागरिकांच्या मनावर ठासवून देण्याची गरज आहे. यासाठी त्यांच्यात जाणीव व उत्साह निर्माण करण्याची गरज आहे. याकरिताच शासनाने लोकांत जनजागृती करता यावी यासाठी संगीत एक माध्यम म्हणून निवडले. त्यानुसार नगर परिषदेने त्यांच्याकडील कचरागाड्यांना ‘म्युझिक सिस्टम’ लावले असून या कचरागाड्या आता जनजागृतीचे माध्यम बनल्या आहेत.
या कचरागाड्या शहरात निघत असताना त्यात सरू असलेली स्वच्छतेचा संदेश देणारी गीते नागरिकांना आकर्षित करीत आहेत. यातून नागरिकांत स्वच्छतेबाबत जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
विशेष म्हणजे कचरागाडी शहरात फिरत असताना नागरिक थांबून उत्सुकतेने हा प्रकार बघत असून पालिकेच्या या प्रयोगाचे कौतूकही केले जात असल्याचे दिसले. म्हणूनच नगर परिषदेच्या कचरागाड्या स्वच्छतादूताचे काम करीत असल्याचे बोलले जात आहे.