कथा न झालेल्या सर्वसाधारण सभेची
By Admin | Updated: March 27, 2015 00:35 IST2015-03-27T00:35:43+5:302015-03-27T00:35:43+5:30
गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय शिवणकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तंबूत गेल्यानंतर भाजपात उठलेल्या वादळामुळे नवनवीन आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

कथा न झालेल्या सर्वसाधारण सभेची
गोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय शिवणकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तंबूत गेल्यानंतर भाजपात उठलेल्या वादळामुळे नवनवीन आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. बुधवारी (दि.२५) आयोजित जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष शिवणकर यांनी रद्द केली. त्यामुळे त्यांच्यावर भाजपातून आता टिकेची झोड उठविली जात आहे.
भाजपाचे बहुमत असलेल्या जिल्हा परिषदेत आता अध्यक्ष शिवणकर राष्ट्रवादी काँग्रेसचे झाले आहेत. त्यामुळे भाजप सदस्यांनी त्यांना टार्गेट करणे सुरू केले आहे. मात्र शिवणकर गटाशी एकनिष्ठ राहून त्याांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणाऱ्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची बाजू सावरण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
दि.२५ ची सर्वसाधारण सभा अध्यक्ष शिवणकर यांच्या पक्षबदलामुळे गाजणार हे निश्चित होते. त्यासाठी भाजप सदस्यांनीही जोरदार फिल्डींग लावली होती. बहुमताच्या आधारावर शिवणकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या सभेत ते करणार होते. मात्र सभाच रद्द करून पुढे ढकलण्यात आल्यामुळे भाजप सदस्यांनी संताप व्यक्त केला.
सभा रद्द करण्याचा अध्यक्षांना अधिकार आहे. सभागृहाच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्यामुळे आणि सदस्यांना बसण्यासाठी योग्य जागा नसल्यामुळे ही सभा रद्द केली, असे विजय शिवणकर यांनी स्पष्ट करून ही सभा नंतर घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)