स्थायी समितीच्या बैठकीत गाजला वॉटर प्यूरिफायर घोटाळा
By Admin | Updated: February 27, 2015 00:38 IST2015-02-27T00:38:38+5:302015-02-27T00:38:38+5:30
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

स्थायी समितीच्या बैठकीत गाजला वॉटर प्यूरिफायर घोटाळा
गोंदिया : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत महिला बालकल्याण विभागातील वॉटर प्युरिफायर निविदा घोटाळा, सिंचन विहिरीची रखडलेली कामे, दोषी ग्रामसेवकांवर कारवाई आदी विषयांसदर्भात चर्चा झाली.
सुरूवातीलाच जि.प. सदस्य राजेश चांदेवार व योगेंद्र भगत यांनी २५ फेब्रुवारी रोजी दै. पुण्यनगरी त प्रकाशित वॉटर प्युरिफायर निविदा घोटाळा या बातमीवरून प्रश्न उपस्थित केला. यावर महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांनी सदर प्रक्रियेत आलेल्या चारही कंपन्याच्या कागदपत्रांची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या कंपन्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचे निर्देश दिले. तसेच निविदा प्रक्रिया पारदर्शी व सर्व नियमानुसारच करण्याचे आदेश दिले. जि.प. सदस्य राजलक्ष्मी तुरकर यांनी मग्रारोहयो अंतर्गत जिल्ह्यातील ३ हजार ८४८ सिंचन विहिरींना प्रशासकीय मान्यता प्राप्त असून ७४३ विहिरींची कामे अपूर्ण आहेत. यात प्रशासकीय मान्यता प्राप्त व ६०:४० चा रेषो पूर्ण असलेल्या गावांमध्ये वाढीव किंमत देऊन मार्च, एप्रिलपर्यंत सदर विहिरी पूर्ण होतील, अशी उपाययोजना करण्यासंदर्भात सांगितले. या विहिरी लवकर पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुबार पीक घेण्याकरिता सिंचनाची व्यवस्था होऊ शकेल. तुरकर यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जासंदर्भात प्रश्न उपस्थित करीत सांगितले की, राष्ट्रीयीकृत बँका देत असलेल्या पीककर्जावर एक वर्षाआधीच व्याज लावून कर्जवसूली करण्यात येत आहेत.