गॅस गळतीने अग्नितांडव
By Admin | Updated: May 13, 2015 01:31 IST2015-05-13T01:31:30+5:302015-05-13T01:31:30+5:30
टायर पंक्चरच्या दुकानात स्वयंपाक बनवीत असताना गॅसच्या गळतीमुळे दुकानाला भीषण आग लागली.

गॅस गळतीने अग्नितांडव
देवरी : टायर पंक्चरच्या दुकानात स्वयंपाक बनवीत असताना गॅसच्या गळतीमुळे दुकानाला भीषण आग लागली. त्यात सदर टायर पंक्चरचे दुकान पूर्णत: जळून राख झाले. दुकानातील लाखो रूपयांचे सामान-साहित्य जळून खाक झाले. ही घटना मंगळवार (दि.१२) सकाळी ८ वाजताच्या सुमारास देवरी येथे घडली.
राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला लागून असलेले रहमत टायर वर्क्स या दुकानातच अलाऊद्दीन जमुराती अंसारी व त्यांचा मुलगा शब्बीर अंसारी बऱ्याच वर्षांपासून राहत होते. मंगळवारी सकाळी ८ वाजता शब्बीरने स्वयंपाक बनविण्याकरिता स्टोव्ह पेटविला होता. मात्र बाजूला ठेवलेल्या सिलेंडरमधून गॅस गळती होत असल्याने सिलेंडर व टायरला आग लागली. ही आग इतकी भीषण होती की दुकानातील सर्व लाखो रुपयांचे साहित्य जळून राख झाले. सिलेंडर फाटल्यामुळे आग अधिकच भडकली होती.
दरम्यान दुकानातील साहित्य वाचविण्याच्या प्रयत्नात शेजारचा दुकानदार महेशकुमार अग्रवाल आगीत होरपळून जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी गर्दी केली व आगीला आटोक्यात आणण्याकरिता शर्थीचे प्रयत्न केले. बाजूलाच लागून असलेल्या जय टायर्स येथील शेकडो टायर देवरीवासीयांच्या प्रयत्नामुळे वाचले. टँकरने पाणी बोलावून आग विझविण्यात आली.
गोंदियावरून अग्निशामकाचे वाहन दोन तासानंतर पोहचले. तोपर्यंत गावकऱ्यांनी आगीला आटोक्यात आणण्यात यश मिळविले होते. मात्र या घटनेमुळे देवरीवासीयांच्या डोळ्यात अश्रू तरळले. (प्रतिनिधी)
देवरीवासीयांच्या साहसामुळे जीवित हानी टळली
टायर पंचरच्या दुकानात लागलेल्या भीषण आगीला जर देवरीवासीयांनी वेळेवर आटोक्यात आणले नसते तर त्याच चाळीमध्ये असलेले टायरचे दुसरे दुकान, आॅईलचे दुकान व कापडाचे दुकान हेसुद्धा आगीत स्वाहा झाले असते, एवढ भीषण हे अग्नितांडव होते. घटनास्थळावरून २०० मीटर अंतरावरच पेट्रोल पंप होते. नेहमीप्रमाणे गावकऱ्यांनी आग विझविण्याकरिता जे साहस दाखविले, त्यामुळे होणारी मोठी जीवित हानी टळली, अशी चर्चा नागरिकांमध्ये होती.
रोख ४५ हजार रूपये अग्नीच्या विळख्यात
अल्लाऊद्दिन अंसारी यांच्या रहमत टायर वर्क्सच्या टायर पंक्चर दुकानात गोंदियाच्या मातीच्या तेलाचे व्यापारी मुन्नासेठ यांचे १५ हजार रूपये ठेवले होते. तसेच त्यांचे स्वत:चे ३० हजार रूपये ठेवले होते. हे रोख ४५ हजार रूपये आगीच्या विळख्यात स्वाहा झाले. त्यामुळे सामान-साहित्यासह रोख रकमेचीही मोठीच हानी झाली.
तीन जण गंभीर जखमी
या गॅस गळतीच्या अग्नितांडवामध्ये रहमत टायर वर्क्सचे अलाऊद्दीन जमुराती अंसारी काही प्रमाणात भाजले गेले. तर त्यांचा मुलगा शब्बीर अंसारी यांचा हात भाजला. तसेच घरमालकाचा लहान भाऊ महेशकुमार रामेश्वर अग्रवाल हे गंभीररीत्या आगीत होरपळून जखमी झाले. त्यांना त्वरित देवरी येथील ग्रामीण रूग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र अद्याप कुणाचीही जीवित हानी न झाल्याने देवरीवासीयांनी सुटकेचा श्वास घेतला.