विश्वकर्मानगरात गॅस सिलिंडरचा स्फोट
By Admin | Updated: April 6, 2015 01:52 IST2015-04-06T01:52:24+5:302015-04-06T01:52:24+5:30
शहरातील फुलचूरपेठमधील विश्वकर्मा नगरातील रहिवासी मार्कंड भजणे यांच्या घरात शनिवारी (दि.४) रात्री ८.३०

विश्वकर्मानगरात गॅस सिलिंडरचा स्फोट
१.५० लाखांचे नुकसान : घरासह सर्व सामानाची नासधूस
गोंदिया : शहरातील फुलचूरपेठमधील विश्वकर्मा नगरातील रहिवासी मार्कंड भजणे यांच्या घरात शनिवारी (दि.४) रात्री ८.३० वाजता दरम्यान गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात घराची एक खोलीच तुटून गेली असून सर्व सामानाची नासधूस झाली आहे. सुमारे दीड लाखांचे नुकसान झाल्याचे भजणे यांनी सांगीतले. तर भजणे कुटुंबीयांचे नशीब बलवत्तर असल्यामुळेच या घटनेत प्राणहानी झाली नाही.
विश्वकर्मानगर (भदाडटोली) येथील रहिवासी मार्कंड दूधराम भजणे (३८) हे पत्नी पद्मा (३७), मुलगा धैर्य (५) व मुलगी दिशा (९) यांच्यासह राहतात. दोनच खोलींच्या घरात त्यांचे वास्तव्य असून ते पेंटिंगचे काम करतात. घटनेच्या दिवशी शनिवारी (दि.४) घराच्या मागील परिसरात असलेल्या हनुमान मंदिरात महाप्रसाद असल्याने ते परिवारासह मंदिरात गेले होते. दरम्यान अचानक स्फोटाचा जोरदार आवाज नागरिकांना ऐकू आला. सर्व धावत भजणे यांच्या घरी आले असता त्यांच्या घराची मागील खोली तुटलेली दिसली. आत जाऊन बघितल्यास गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याचे दिसून आले.
हा स्फोट एवढा जोरदार होता की, त्यात खोलीच्या भिंती व छताच्या सिमेंट शिट तुटून गेल्या. शिवाय खोलीत ठेवलेला दिवान, टिव्ही, गॅस शेगडी, भांडे, कुलर, कपडे व धान्याची नासाडी झाली असून सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. घर तुटल्यामुळे भजणे कुटुंबीयांना शेजाऱ्यांच्या घरात रात्र काढावी लागली. खोलीच्या भिंती व शिट तुटल्यामुळे भजणे यांना घराचे बांधकामच करावे लागणार आहे. तर स्फोटामुळे त्यांच्या घरातील भांडे बाहेर दूरवर फेकल्या गेले होते.
घटनेची माहिती मिळताच रविवारी (दि.५) सकाळी शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच घटनास्थळ ग्रामीण क्षेत्रात येत असल्याने पटवारी सोनवाने यांनीही घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तर इंडेन गॅस कंपनीचे जिल्हा वितरक खोब्रागडे यांनीही भेट दिली. या स्फोटामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी भजणे यांच्यासह परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)
भजणे कुटुंबीयांवर हनुमंताचीच कृपा
हनुमान जयंतीचा दिवस असल्याने घराच्या मागील हनुमान मंदिरात महाप्रसादाचा कार्यक्रम होता. महाप्रसाद घेण्यासाठी मार्कंड भजणे पत्नी व अपत्यांसह मंदिरात गेले व पाच मिनिटांनंतरच त्यांच्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे घराच्या भिंती पडल्या असून यातून स्फोट किती जोरदार होता हे दिसून येते. अशात भजणे कुटुंबीय घरात राहिले असते तर काही अप्रिय घटना घडली असती. मात्र हनुमंताचीच कृपा असल्यामुळे ते घराबाहेर पडले असे परिसरातील नागरिक बोलत आहेत.
तरूणाने वेळीच भरलेला सिलिंडर काढला
गॅस सिलिंडरच्या स्फोटाचा आवाज ऐकून परिसरातील लोकं भजणे यांच्या घरी जमा झाले. घरात जाऊन बघितले असता सर्व सामान अस्तव्यस्त पडून होते. तर भरलेला एक सिलिंडर त्याच खोलीत ठेवलेला होता. सिलिंडरचा स्फोट बघताच परिसरातीलच अनिल माहुले या तरूणाने लगेच स्फोट झालेल्या खोलीतून भरलेला सिलिंडर बाहेर काढला. विशेष म्हणजे भजणे यांनी दोन महिन्यांपूर्वीच इंडेन कंपनीचे गॅस कनेक्शन घेतले आहे.