बागांना मिळणार ‘अमृत’
By Admin | Updated: May 5, 2017 01:38 IST2017-05-05T01:38:09+5:302017-05-05T01:38:09+5:30
केंद्र शासनाच्या ‘अमृत’ अभियानांतर्गत आता विकासाची दारे उघडण्यात आली असून यात गोंदिया शहराचा समावेश करण्यात आला आहे.

बागांना मिळणार ‘अमृत’
हरित क्षेत्र विकास प्रकल्प : नेमलेल्या एजन्सीकडून झाली पाहणी
कपिल केकत गोंदिया
केंद्र शासनाच्या ‘अमृत’ अभियानांतर्गत आता विकासाची दारे उघडण्यात आली असून यात गोंदिया शहराचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानांतर्गत हरित क्षेत्र विकास प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी नेमलेल्या एजंसीकडून शहरातील बागांची नुकतीच पाहणी करण्यात आली आहे. आता एजंसीकडून या बागांच्या सौंदर्यीकरणाचे डिजाईन तयार करून नगर परिषदेला पाठविले जाईल व तसा प्रस्ताव नगर परिषदेकडून शासनाकडे सादर केला जाईल. याला मंजूरी मिळाल्यास शहरातील बागांना सौंदर्यीकरणाचे ‘अमृत’ मिळणार.
गोंदिया शहराचा सर्वच क्षेत्रात विकास होत असला तरिही हरित क्षेत्राच्या बाबतीत शहर मागासलेलेच आहे. आजघडीला शहरात सिव्हील लाईन्स परिसरातील सुभाष बाग हे एकच बाग उरले असून याशिवाय दुसरे हिरवळीचे स्थान नाही. मात्र देखभाल दुरूस्ती अभावी सुभाष बागेचीही स्थिती काही बरी नाही. नगर परिषदेकडून बागेला रेटत चालल्याचे दिसून येत आहे.
परिणामी शहरवासीयांना मोकळ््या हवेत श्वास घेण्यासाठी दुसरी जागाच उरलेली नाही. बागेत कित्येक वर्षांपूर्वी लागलेले मोजके जुनेच खेळणे लागलेले आहेत. त्यामुळे चिमुकल्यांचाही बागेत येऊन हिरमोडच होतो.
आजच्या धकाधकीच्या जिवनात मोकळ््या हवेत हिरवळीवरबसून काही वेळ घालविण्यासाठी सर्वांनाच एका जागेची गरज आहे. शहरात अन्य असे ठिकाण नसून आहे ते फक्त एक सुभाष बागच.
त्यामुळे अवघ्या शहरातील नागरिक सुभाष बागेत येतात. शिवाय एवढ्या मोठ्या शहरात अन्य असे एकही ठिकाण नाही. परिणामी मन मारून लोकांना सुभाष बागेत यावे लागत असल्याची वस्तूस्थिती आहे. याकरिता पालिकेकडून आता शहरात काही बागांची निर्मिती केली जात आहे.
मात्र आता सुभाष बागेसह शहरात नव्याने तयार होत असलेल्या पिंडकेपार व कुडवा येथील बागांचाही विकास होण्याची शक्यता दिसून येत आहे. त्याचे कारण असे की, केंद्र शासनाच्या ‘अमृत’ अभियानांतर्गत हरित क्षेत्र विकास प्रकल्पावर गांभीर्याने लक्ष दिले जात आहे.
या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी सात सल्लागार समित्यांचे गठन करण्यात आले आहे. यात गोंदिया शहरासाठी दिल्ली येथील ‘ओसीस डिजाईन’ या एजंसीची नेमणूक करण्यात आली आहे.
नुकतेच या एजंसीचे वरूण सैनी नामक कर्मचारी गोंदियात येऊन गेलेत. या दौऱ्यात त्यांनी सुभाष बाग, पिंडकेपार व कुडवा येथील बागांची पाहणी करून त्यांचे छायाचित्र काढले आहेत. येथून संकलीत केलेली ही सर्व माहिती ते आता त्यांच्या एजंसीकडे देणार असून एजंसीकडून या बागांच्या सौंदर्यीकरणासाठी डिजाईन्स तयार केले जातील. ते डिजाईन्स एजंसी गोंदिया नगर परिषदेला पाठविणार आहे व नगर परिषद त्याचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविणार आहे.
या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यास शहरातील या बागांचा कायापालट होणार असून एकप्रकारे त्यांना ‘अमृत’च मिळणार आहे.
एक कोटींच्या वार्षिक निधीची तरतूद
‘अमृत’ अभियानांतर्गत हरित क्षेत्र विकास प्रकल्पासाठी एक कोटींची वार्षिक तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील या बागांच्या प्रस्तावाला शासनाकडून मंजूरी मिळाल्यास या बागांच्या सौंदर्यीकरण व देखभाल दुरूस्तीसाठी नगर परिषदेला दरवर्षी एक कोटींचा निधी मिळणार असल्याची माहिती आहे. एवढा निधी मिळत असल्यास येथील बागांचे चित्र काय राहणार याची कल्पना करता येते.
डोंगरगाव तलावाचीही पाहणी
गोंदियाच्या दौऱ्यावर आलेले सैनी यांनी शहरातील बागांसोबतच डोंगरगाव तलावाचीही पाहणी करून त्याचे छायाचित्र काढून घेतले आहेत. मात्र एक कोटींच्या निधीतून बागांसोबतच तलावाचे सौंदर्यीकरण शक्य नाही. त्यामुळे एकदा या प्रस्तावाला मंजूरी मिळाली तर मिळत राहणाऱ्या निधीतून नक्कीच तलावाचेही सौंदर्यीकरण होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय अन्य काही विकासकामेही होत राहतील. यामुळे या प्रस्तावाला मंजूरी मिळणे गरजेचे झाले आहे.