बाल व मातामृत्यूचे तांडव पाहणार गंगाबाई
By Admin | Updated: April 4, 2015 01:16 IST2015-04-04T01:16:43+5:302015-04-04T01:16:43+5:30
साडेतेरा लाख लोखसंख्येची धुरा सांभाळणाऱ्या बाई गंगाबाई सरकारी महिला रुग्णालयात प्रसूतीतज्ज्ञांची वाणवा असल्याने

बाल व मातामृत्यूचे तांडव पाहणार गंगाबाई
रुग्णालयच आजारी : तज्ज्ञांअभावी रूग्णांचे बेहाल
नरेश रहिले ल्ल गोंदिया
साडेतेरा लाख लोखसंख्येची धुरा सांभाळणाऱ्या बाई गंगाबाई सरकारी महिला रुग्णालयात प्रसूतीतज्ज्ञांची वाणवा असल्याने येथील प्रसूती अडत आहे. एकाच डॉक्टरच्या खांद्यावर बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयातील प्रसुती अवलंबून असल्याने आता शासनच येथील बाल व माता मृत्यूचे तांडव पाहण्यास उत्सुक आहे की काय? असा सवाल केला जात आहे.
येथील प्रसुतीचे प्रमाण पाहून शासनाने सात प्रसूती तज्ज्ञांची मंजूरी दिली. मात्र सध्या एकच प्रसूतीतज्ज्ञ कार्यरत असल्याने गर्भवती महिलांच्या शस्त्रक्रिया अडल्या आहेत. एकाच डॉक्टरावर पूर्ण प्रसुतींचा भार असल्याने ते गंभीर रूग्णांना प्राधान्य देतात. मात्र सतत काम करणाऱ्या एकाच डॉक्टरावर कामाचा ताण मोठा असल्याने त्यांच्याही हातून चुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गोंदिया जिल्ह्यात महिला जिल्हा रूग्णालय म्हणून गंगाबाई एकच आहे. महिन्याकाठी ५५० ते ६०० च्या घरात प्रसूती होतात. यातील २०० गर्भवती महिलांच्या शस्त्रक्रियेव्दारे प्रसूती करण्यात येते. सुरूवातीपासून गंगाबाई स्त्री रूग्णालयात वर्षाकाठी सात हजार प्रसूती होत असल्याने येथे सात प्रसूती तज्ज्ञांच्या नियुक्तीला मंजूरी देण्यात आली. यापैकी पाच प्रसूती तज्ज्ञांची व्यवस्था येथे करण्यात आली. परंतु कोणत्या ना कोणत्या कारणाने येथील कार्यरत चार प्रसूती तज्ज्ञ सुट्टीवर गेल्यामुळे एकट्या डॉक्टरावर संपुर्ण गर्भवती महिलांची प्रसूती करण्याची पाळी आली आहे. डॉ. गार्गी बहेकार सहा महिन्याच्या सुट्टीवर गेल्या आहेत. डॉ.योगेश सोनारे यांचे लग्न असल्याने ते दिड महिन्याच्या सुट्टीवर गेले आहेत. डॉ, पूनम पारधी ह्या सुध्दा एक महिन्याच्या सुट्टीवर गेल्या आहेत. तर डॉ. शितल खंडेलवाल यांच्या पायाला जखम लागल्यामुळे त्या देखील दिड महिन्याच्या सुट्टीवर गेल्या आहेत.
शासन बाल व माता मृत्यू रोखण्यासाठी एका रूग्णालयावर वर्षाकाठी कोट्यवधी रूपये खर्च करते. परंतु बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात डॉक्टर देत नसल्याने बाल व माता मृत्यू रोखण्यासाठी गंगाबाई खर्च करण्यात येणारे पैसे निरर्थक आहेत. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या महिन्याकाठी ५०० च्या वर परंतु प्रसूती तज्ज्ञ राहात नसल्याने येथील रूग्णांना नाईलाजास्तव खासगी रूग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. एकच डॉक्टर एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसूती अशा करेल असा प्रश्न उपस्थित होतो. परिस्थिती सांभाळण्याच्या नादात त्यांच्याकडूनही चुका होण्याची शक्यता आहे. परिणामी माता व बाल मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
येथे प्रसूतीतज्ज्ञांची गरज असतानाही याकडे आरोग्य विभागाच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. एकच डॉक्टर कुणा-कुणाकडे लक्ष कसा देईल ही समस्या असल्याने दोन-दोन दिवस अनेक रूग्णांकडे ढुंकूनही पाहिले जात नाही. त्यामुळे रूग्णांमध्ये गंगाबाई स्त्री रूग्णालयाच्या सेवेबद्दल असंतोष पसरत आहे. गरिब रूग्णांकडे गंगाबाईत दुर्लक्ष होत आहे.
आरोग्य अभियानांतर्गत कर्करोग निदान दिन साजरा करण्यात येतो. परंतु गर्भवती महिलांची प्रसूती होण्यास ज्या ठिकाणी अडचण आहे. त्याकडे जिल्हा शल्य चिकित्सक व अधीक्षक लक्ष देत नाही. गंगाबाईच्या सेवेबद्दल रूग्णांचे नातेवाईक आक्रोश व्यक्त करीत असून ही परिस्थीती न सांभाळल्यास रुग्णांचे नातेवाईक संतापाच्या भरात काहीही करण्याची शक्यता नाकारता येत नाही. (तालुका प्रतिनिधी)
७२ तासांपासून सतत एकच डॉक्टर
गंगाबाईतील पाच पैकी चार प्रसूती तज्ज्ञ सुटीवर गेल्याने येथे फक्त डॉ.सायास केंद्रे हे एकटेच मागील ७२ तासांपासून अविरत सेवा देत आहेत. त्यांनी मागील तीन दिवसांपासून गंगाबाईत मुक्काम ठोकला आहे. सतत काम करीत असल्यामुळे त्यांच्याही आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रसूती होत नाही तेथे प्रसूतितज्ज्ञ
गंगाबाई स्त्री रूग्णालयात प्रसूतीतज्ज्ञांचा अभाव आहे. मात्र गोंदिया जिल्ह्यात ज्या ठिकाणी प्रसूती न करता रेफर टू गंगाबाई केले जाते, त्या ठिकाणी प्रसूती तज्ज्ञ ठेवण्यात आले आहेत. नवेगावबांध येथील ग्रामीण रूग्णालयात डॉ. पंचभाई, सालेकसा ग्रामीण रूग्णालयात डॉ. नितनवरे, तिरोडा येथे डॉ. राऊत, ग्रामीण रूग्णालय रजेगाव येथे डॉ.आशा अग्रवाल व केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात डॉ. दुर्गाप्रसाद पटले हे नियुक्त आहेत. या ठिकाणी प्रसुती होत नाही. प्रसुतीसाठी महिला दाखल झाल्या तरी त्यांना गंगाबाईत रेफर केले जाते. त्यांची प्रसूती गंगाबाईत होते. त्या रूग्णालयातील प्रसूती तज्ज्ञांना प्रतिनियुक्तीवर गंगाबाईत आणणे गरजेचे आहे. परंतु आरोग्य विभागातील बड्या अधिकाऱ्यांनी गंगाबाईला वाऱ्यावर सोडले आहे.
गर्भपात, कुटुंबकल्याणच्या रूग्णांना ठेंगा
बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात शासनाचे अधिकृत गर्भपात केंद्र, कुटुंब कल्याण योजनेच्या शस्त्रक्रिया व राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या शस्त्रक्रिया करण्यात याव्या असे शासनाने ठरविले. परंतु तज्ज्ञांअभावी या तिन्ही प्रकरच्या महिलांची काळजी घेण्यासाठी गंगाबाई तज्ज्ञाअभावी असमर्थ ठरली आहे.