गणेश मंडळांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:35 IST2021-09-09T04:35:43+5:302021-09-09T04:35:43+5:30

गोंदिया : गणेशोत्सव साजरा करताना गणेश मंडळांनी कायद्याच्या चाकोरीत राहून गणेशोत्सव साजरा करावा, यासाठी रामनगर पोलीस ठाण्याच्या ...

Ganesh Mandals should keep law and order intact | गणेश मंडळांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी

गणेश मंडळांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी

गोंदिया : गणेशोत्सव साजरा करताना गणेश मंडळांनी कायद्याच्या चाकोरीत राहून गणेशोत्सव साजरा करावा, यासाठी रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३४ आणि गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५७ अशा एकूण ९१ गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची सभा घेण्यात आली. या सभेत गणेश मंडळांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी केले आहे.

येथील श्री गुरूनानक सभागृहात सोमवारी (दि. ६) आयोजित गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सभेला उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, गोंदिया शहरचे ठाणेदार महेश बनसोडे, रामनगरचे ठाणेदार देविदास कठाडे, जिल्हा विशेष शाखेचे प्रमोद घोंगे, सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, व्होंडे, वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पवार उपस्थित होते. यावेळी गणेश मंडळांची धर्मादाय आयुक्तांकडून नोंदणी करून घ्यावी. आपल्या मंडळातर्फे उभारण्यात आलेल्या मंडळामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पावसाचे पाणी मूर्तीवर पडणार नाही, याची काळजी घ्यावी, मूर्तीच्या सुरक्षेसाठी २४ तास स्वयंसेवकांची नेमणूक करावी. वीजविभागाच्या परवानगीशिवाय किंवा खांबावरून सरळ वीजपुरवठा घेऊ नये. मंडळांमध्ये सजावटीकरिता करण्यात आलेल्या वीजरोषणाईची उंची जास्त ठेवावी. दानपेटीत समाजकंटकांकडून घातपाताच्या हेतूने कोणतीही स्फोटक वस्तू घातली जाणार नाही, याकरिता दानपेटीवर लक्ष ठेवण्यासाठी चाणाक्ष स्वयंसेवक ठेवावेत. मंडळाचे देखावे व दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पुरुष-महिला अशा वेगवेगळ्या रांगांची व्यवस्था ठेवावी. मंडपात आग विझवण्याचे साधन (फायर एस्टिंग्विशर) ठेवावे. अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटर ठेवावे. गणेश मंडळांतर्फे घेण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये इतर धर्मीयांच्या भावना दुखावतील, असे कार्यक्रम घेऊ नये, अशा विविध सूचना देण्यात आल्या.

Web Title: Ganesh Mandals should keep law and order intact