गणेश मंडळ बुजविणार खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 23:51 IST2017-08-29T23:50:55+5:302017-08-29T23:51:26+5:30
लोकांमध्ये सामाजिक एकोपा निर्माण व्हावा, बंधूभाव निर्माण होऊन विधायक कार्य व्हावीत, सामाजिक बांधिलकी जपली जावी.

गणेश मंडळ बुजविणार खड्डे
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : लोकांमध्ये सामाजिक एकोपा निर्माण व्हावा, बंधूभाव निर्माण होऊन विधायक कार्य व्हावीत, सामाजिक बांधिलकी जपली जावी. याच उद्देशाने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरूवात केली. याच गोष्टींचे भान ठेवित शहरातील काही गणेश मंडळांनी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
शहरातील रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी डागडुजी न केल्याने रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचून रस्त्यांना गटाराचे स्वरुप आले आहे. यामुळे शहरातील रस्त्यांवरुन वाहने चालविणाºया वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. तर हेच हाल पायी चालणाºया नागरिकांचे आहे. सिव्हिल लाईन, रामनगर, छोटा गोंदिया, गांधी प्रतिमा, जयस्तंभ चौक या मार्गावरील रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत.
या मार्गावर दिवसभर सतत वर्दळ असते. रस्त्यांवरील खड्डयांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने त्यांना सध्या गटाराचे स्वरुप आले आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी शहरातील काही जागृत नागरिकांनी नगर परिषदेकडे तक्रार केली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. रस्त्यांवरील खड्डे कायम असल्याने गणेशदर्शनासाठी घराबाहेर पडणाºया नागरिकांना त्याचा फटका बसत आहे.
याच सर्व गोष्टींची दखल शहरातील काही गणेश मंडळांनी घेतली आहे. केवळ प्रसिध्दी मिळावी यासाठी नव्हे तर सामाजिक बांधीलकी जपत शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा संकल्प केला आहे. सिव्हिल लाईन येथील अपना गणेशोत्सव मंडळ, छोटा गोंदिया येथील अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ स्व:खर्चातून रस्त्यांवरील खड्डे बुजविणार असल्याचे मंडळाच्या पदाधिकाºयांनी लोकमतशी बोलताना सांगितले. हाच आदर्श शहरातील इतर मंडळानी घेण्याची गरज आहे.
‘खड्डे बुजवा जीव वाचवा’अभियान
गणेश मंडळाचा उद्देश सामाजिक बांधिलकी जपून समाजाचा उध्दार करणे हा आहे. यंदाचा गणेश उत्सव अधिक समाजाभिमुख करण्यासाठी सामाजिक कार्य करणे गरजेचे आहे. याच प्रयत्नाचे एक पाऊल म्हणजे ‘खड्डे बुजवा जीव वाचवा’ हे अभियान राबविण्याचे आवाहन सार्वजनिक न्यास नोंदणी विभागाने केले आहे. त्यानुसार सार्वजनिक गणेश मंडळांनी त्यांच्याकडे जमा होणाºया लोक वर्गणीतून १० टक्के रक्कम परिसरातील असलेले खड्डे बुजविण्यासाठी व गरीब मुलांच्या सेवेसाठी खर्च करण्याचे आवाहन सहायक धर्मदाय आयुक्त ममता रेहपाडे यांनी केले आहे.
इतर मंडळांनी घ्यावा आदर्श
शहरातील नागरिकांप्रती आपले कर्तव्य आणि सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून केवळ शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील गणेश मंडळानी यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.