सराफा व्यावसायिकांची गांधीगिरी
By Admin | Updated: March 6, 2016 01:35 IST2016-03-06T01:33:06+5:302016-03-06T01:35:56+5:30
एक्साईज ड्युटी लावल्याने सराफा व्यापारात नफा राहणार नसल्याने येथील सराफा व्यावसायिकांनी शासनाच्या या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी....

सराफा व्यावसायिकांची गांधीगिरी
‘ना नफा, ना तोटा’ तत्त्व : सरकारी टॅक्सविरोधात असोसिएशनचे आंदोलन
गोंदिया : एक्साईज ड्युटी लावल्याने सराफा व्यापारात नफा राहणार नसल्याने येथील सराफा व्यावसायिकांनी शासनाच्या या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर शनिवारी (दि.५) दुर्गा चौकात चहानाश्त्याचे दुकान थाटले. सराफा व्यवसायिकांचे हे आगळेवेगळे गांधीगिरीचे आंदोलन शहरात चर्चेचा विषय ठरले. सोमवारपर्यंत (दि.७) वाढविण्यात आलेल्या सराफा व्यवसायिकांच्या या बंदबाबत आता सोमवारीच पुढील निर्णय होणार आहे. दरम्यान, या आंदोलनामुळे गोंदियासह जिल्हाभरात कोट्यवधीचे व्यवहार ठप्प पडले आहेत.
अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदी-विक्रीवर एक टक्के एक्साईज ट्युटी लावली आहे. भारतात दागिन्यांचे ९० टक्के काम कारागिरांकडून केले जाते. त्यात आता दागिन्यांच्या खरेदी-विक्रीवर एक्साईज ड्युटी लावण्यात आल्याने त्यांच्या नियमावलीचे पालन करणे सुवर्ण व्यावसायिकांसाठी अशक्य असून देशभरात सुमारे तीन कोटींपेक्षा जास्त लोकांसमोर पोटापाण्याचा प्रश्न उभा राहणार आहे.
शासनाने लावलेली एक्साईज ड्युटी मागे घेण्यात यावी या मागणीसाठी देशपातळीवर सराफा व्यवसायिकांनी बंद पुकारला आहे. २, ३ व ४ मार्चपर्यंत हा बंद होता. या दरम्यान गोंदिया सराफा असोसिएशनच्यावतीने गुरूवारी (दि.३) जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अर्थमंत्री अरूण जेटली यांना निवेदन पाठविण्यात आले. आपल्या मागणीला घेऊन सराफा असोसिएशनचे मंत्र्यांसोबत बोलणे सुरू असून त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. आकरिता बंद सोमवारपर्यंत (दि.७) वाढविण्यात आला आहे.
एक्साईज ड्युटी लावल्याने आता सराफा व्यापारात काहीच नफा राहणार नसल्याने शासनाच्या या निर्णयाचा विरोध दर्शविण्यासाठी व सराफा व्यवसायिकांची मनस्थिती दशर्विण्यासाठी सराफा असोसिएशनने शनिवारी (दि.५) दुर्गा चौकात चहानाश्त्याचे दुकान थाटले. ‘ना नफा, ना तोटा’ या तत्वावर लावण्यात आलेल्या या दुकानात फक्त ५ रूपयांत लोकांना चहानाश्ता देण्यात आला. सराफा व्यवसायिकांच्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची शहरात चर्चा होती. चहानाश्त्याच्या दुकानात चहा-नाश्ता देत असलेल्या शहरातील मोठ्या सराफा व्यवसायिकांना बघून शहरवासीयांना आश्चर्य वाटत होते. (शहर प्रतिनिधी)