गांधीजी दिसले का कुणाला...?
By Admin | Updated: July 5, 2014 00:56 IST2014-07-05T00:56:08+5:302014-07-05T00:56:08+5:30
शहरातील पुतळ्यांच्या भोवती होर्डिंग्स व पोस्टर्स लावण्यात येऊ नये असा नियम येथील नगरसेवकांनीच बनविला आहे.

गांधीजी दिसले का कुणाला...?
गोंदिया : शहरातील पुतळ्यांच्या भोवती होर्डिंग्स व पोस्टर्स लावण्यात येऊ नये असा नियम येथील नगरसेवकांनीच बनविला आहे. मात्र त्यांनाच या नियमाचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. कारण येथील गांधी प्रतिमा चौकात गांधीजींच्या पुतळ््या समोरच शिवसेनेचे दोन होर्डींग्स लावण्यात आले आहेत. यामुळे गांधीजींचा पुतळा त्यांच्या मागे लपून गेला आहे. अशात गांधीजी दिसले का असे विचारावे लगण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे.
शहरातले होर्डिंग युद्ध तसे नवे नाही. एकाने चार लावले तर आपण चाळीस लावावे अशी स्पर्धा येथे दिसून येते. त्यातही येथील राजकीय पक्षांना अख्खे शहर निपुरे पडते. त्यामुळेच शहरातील थोर पुरूषांचे पुतळे देखील त्यांच्या होर्डिंग्स युद्धातून सुटत नाही.
एखादा कार्यक्रम किं वा पक्षातील मोठ्या नेत्यांचे आगमन असल्यास येथील नेते मंडळीला तर अधिकच हुरूप येतो. असलाच काहीसा प्रकार सध्या शहरात बघावयास मिळत आहे.
शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे २८ जून रोजी शहरात येऊन गेले. त्यांचे आगमन होत असल्याने येथील शिवसेना चांगलीच फॉर्मात दिसून आली. पक्ष प्रमुखांना खुश करण्यासाठी शिवसेनेने अख्या शहरात होर्डिंग्स लावून शहर भगवे करून टाकले.
ठाकरेंना खुश करण्याच्या नादात मात्र येथील गांधींजींचा पुतळा सुद्धा शिवसेनेच्या हातून सुटला नाही. गांधीजींच्या पुतळ्यासमोरच दोन होर्डिंग्स लावण्यात आले. त्यामुळे मात्र गांधीजींचा पुतळा या होर्डिंग्सच्या मागे लपून गेला आहे. या मार्गाने येता-जाता गांधीजींचा पुतळा दिसून येत होता. आजघडीला मात्र येथे गांधीजी नव्हे तर शिवसेनेचे होर्डींग्स दिसून येत आहेत.
विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत नाना पटोले विजयी होताच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही पुतळ््या भोवती होर्डिंग्स लावले होते. त्यात माजी नगराध्यक्ष सविता इसरका यांचा समावेश होता. तर आता शिवसेनेने एक सोडून दोन होर्डींग्स लावले आहेत. त्यात विद्यमान नगरसेवक राजकुमार कुथे यांचा समावेश आहे.
एकंदर दोन्ही प्रसंग बघितल्यास नगर परिषदेत बसून कायदा बनविणाऱ्या या सदस्यांनाच कायद्याचा विसर पडल्याचे यातून स्पष्ट दिसून येते. तर त्यांच्या या कृत्यावर नागरीक सुद्धा अच्छे दिन आ गये है असा टोमणा मारण्यापासून सुटत नसल्याचेही बघावयास मिळत आहे. (शहर प्रतिनिधी)