उमेदवारांच्या आयात निर्यातीचा खेळ

By Admin | Updated: June 25, 2015 00:45 IST2015-06-25T00:45:28+5:302015-06-25T00:45:28+5:30

तालुक्यातील चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समितीच्या जागेसाठी मैदानात उतरलेल्या उमेदवारांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

The game of export of candidates | उमेदवारांच्या आयात निर्यातीचा खेळ

उमेदवारांच्या आयात निर्यातीचा खेळ

विद्यमान सदस्यांना डावलले : काहींची बंडखोरी तर काहींचा पक्षबदल
विजय मानकर सालेकसा
तालुक्यातील चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समितीच्या जागेसाठी मैदानात उतरलेल्या उमेदवारांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. काही पक्षांनी त्यांच्या आवडीनुसार उमेदवार आयात-निर्यातीचा खेळ खेळला आहे. विशेष म्हणजे विद्यमान जि.प. किंवा पं.स. सदस्यांना कुठेही पुन्हा उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे एक दोन ठिकाणी पक्ष बदलून किंवा बंडखोरी करुन ते उमेदवार निवडणूक मैदानात पुन्हा आपले नशिब आजमावत आहेत. तर काही प्रमुख पक्षांनी उमेदवारांनाच आयात निर्यात करुन निवडणूक जिंकण्याचा डाव खेळला आहे.
जि.प.च्या चार जागांपैकी झालीया आणि आमगाव खुर्दची जागा एस.टी.साठी आरक्षित असल्याने सर्व पक्षांना एकतर नवखे उमेदवार मैदानात उतरवावे लागले. किंवा बाहेरुन उमेदवार बोलवावे लागले.
झालिया जि.प.क्षेत्राची जागा एस.टी.साठी राखीव झाल्याने विद्यमान जि.प. सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवकीबाई नागपुरे या बाद झाल्या. येथे या पक्षाने आमगाव खुर्द येथील बिसराम चर्जे यांना आयात केले आहे. या जागेवर पुन्हा आपला कब्जा जमविण्यासाठी भाजपाने पिपरीया क्षेत्रातील शंकर मडावी यांना आयात केले आहे. काँग्रेस पक्षाने स्थानिक म्हणून विजय टेकाम या नवख्याला उमेदवारी दिली आहे. शंकर मडावीक यांनी या पूर्वी १९९७ मध्ये पिपरीया व झालीया एकत्रित असलेल्या कावराबांध जि.प.क्षेत्रातून काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यामुळे त्यांना येथून निवडून येण्याची खात्री वाटत आहे. तर बिसराम चर्जे यांनी सुद्धा आमगाव खुर्द क्षेत्रातून प्रतिनिधीत्व केले आहे. आता मतदार बाहेरुन आलेल्या अनुभवी उमेदवाराला पसंती देतात की नवख्या, परंतु स्थानिक उमेदवाराला महत्व देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पिपरीया जि.प.क्षेत्रात यावेळी सर्वात रंगतदार निवडणूक होणार आहे. ही जागा सर्वसाधारण गटासाठी खुली असून या जागेवर सर्वच पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. या जागेवर आमगाव खुर्द येथील दिग्गज उमेदवारांची निर्यात करण्यात आलेली आहे. यात भाजपने माजी सभापती ज्यांनी सर्वात जास्त पं.स.वर राज केले असे पुरुषोत्तम वशिष्ठ याचे पुत्र अजय वशिष्ठ यांना सालेकसावरुन पाठविले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने गोंदिया जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष दुर्गा तिराले यांना तर शिवसेनेने, तालुका शिवसेना प्रमुख कुलतारसिंह भाटीया यांची निर्यात केली आहे. मात्र काँग्रेस येथे ही नवख्या परंतु स्थानिक युवक ओमप्रकाश लिल्हारे यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान जि.प. सदस्य प्रेमलता दमाहे यांचा भाजपने पुन्हा विचार केला नाही. त्यामुळे त्यांचे पती राजकुमार दमाहे यांनी बंडखोरी कडून अपक्ष उतरण्यासाठी नामांकन भरले. आदिवासीबहुल या क्षेत्रात कोण बाजी मारेल याबद्दल सर्वत्र चर्चा चालल्या आहेत. या क्षेत्रात सर्वाधिक नऊ उमेदवार मैदानात आल्याने मतविभाजन होण्याची दाट शक्यता आहे.
आमगाव खुर्द जि.प. क्षेत्रातून काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे एकूण तीनच उमेदवार रिंगणात उतरले आहेत. एस.टी.साठी राखीव असल्यामुळे या जागेवर तिन्ही पक्षांनी नवयुवकांना घरबसल्या उमेदवारी दिली आहे. भाजपने ग्रा.पं. सदस्य देवराज वडगाये तर काँग्रेसने सरपंच योगेश राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नितेश गावड यांना उमेदवारी दिली. ‘जो जिता वही सिकंदर’ सारखी परिस्थिती येथे दिसत आहे.
कारुटोला जि.प.क्षेत्र महिला ओ.बी.सी. प्रवर्गासाठी राखीव असून येथे बोहरे आडनाव असलेल्या तीन महिला रिंगणात असल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपकडून अनिता बोहरे, काँग्रेसकडून लता दोनोडे, राष्ट्रवादीकडून वंदना बोहरे या प्रमुख उमेदवार असून सर्व उमेदवार मात्र स्थानिक आहेत. आपआपल्या पक्षाचे मतदार रोखून ठेवणे येथे मोठे आव्हान मानले जात आहे. एकंदरित तालुक्यातील शिर्ष नेत्यांना सुद्धा पक्षासाठी प्रतिष्ठा पणाला लावावी लागत आहे.

Web Title: The game of export of candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.