जिल्ह्यातील २०० उद्योगांची भट्टी बंद
By Admin | Updated: February 23, 2017 00:18 IST2017-02-23T00:18:40+5:302017-02-23T00:18:40+5:30
गोंदिया जिल्ह्यात मोठे उद्योग एकही नाही. परंतु छोटे उद्योगाची नोंदणी २२५८ असून यातील २०० उद्योग बंद झाले आहेत.

जिल्ह्यातील २०० उद्योगांची भट्टी बंद
आठ वर्षांपासून सर्वेक्षणच नाही : बेरोजगारीचे चऱ्हाट वाढतीवर, उद्योग घटताहेत
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात मोठे उद्योग एकही नाही. परंतु छोटे उद्योगाची नोंदणी २२५८ असून यातील २०० उद्योग बंद झाले आहेत. २०५८ लघु उद्योग सुरू असावेत असा अंदाज जिल्हा उद्योग केंद्राचा आहे. कोणते उद्योग सुरू आणि कोणते उद्योग बंद याची शहानिशा मागील आठ वर्षापासून करण्यात आली नाही. गोंदिया जिल्हा उद्योगाबाबत उदासीन आहे.
गोंदिया जिल्ह्यात ३५० राईस मील, प्लायश विटाचे २५ उद्योग, प्लास्टीकचे ४० युनिट, आरो प्लांट १०, फेब्रीकेशन व इतर असे २ हजार २५८ उद्योग गोंदिया जिल्हा उद्योग केंद्रात नोंदणी करण्यात आले. या उद्योगाचे सर्वेक्षण २००८-०९ या वर्षात केले होते. तेव्हा त्या सर्वेक्षणात नोंदणी असलेल्यापैंकी २०० उद्योग बंद असल्याचे लक्षात आले होते. परंतु आता आठ वर्ष उलटूनही सर्वेक्षण न झाल्यामुळे सद्यस्थितीत गोंदिया जिल्ह्यात किती उद्योग बंद आहेत याची निश्चीत आकडेवारी या कार्यालयाकडे नाही.
आधी सर्वेक्षण निरीक्षक उद्योगाच्या ठिकाणी भेटी देऊन ते उद्योग सुरू आहेत किंवा नाही याची पाहणी करीत होते. परंतु निरीक्षकांचा दौरा शासनाने बंद केल्याने किती उद्योग सुरू किती उद्योग बंद आहेत याची माहिती या उद्योग केंद्रालाच नाही. नोंदणी करण्यात आलेल्या २२५८ उद्योगांवर तुटपुंजे लोक कामावर आहेत. आता आॅनलाईन उद्योगाची नोंदणी करण्याचे काम होत असल्यामुळे या कार्यालयाला जिल्ह्यात किती उद्योग आहेत हे ही सांगता येत नाही. (तालुका प्रतिनिधी)