अल्पसंख्याक भागाच्या विकासासाठी मिळाला निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:53 IST2021-02-06T04:53:46+5:302021-02-06T04:53:46+5:30
गोंदिया : गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांतील अल्पसंख्याकबहुल भागातील पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, यासाठी खा. प्रफुल्ल पटेल ...

अल्पसंख्याक भागाच्या विकासासाठी मिळाला निधी
गोंदिया : गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांतील अल्पसंख्याकबहुल भागातील पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, यासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांनी राज्याचे अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांच्यासोबत काही दिवसांपूर्वीच चर्चा केली होती. त्यानंतर या विभागाने गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील अल्पसंख्याक भागात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर खा. प्रफुल्ल पटेल आले असता त्यांना अल्पसंख्याक समाजाच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन कब्रस्थान व सुरक्षा भिंत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर माजी आ. राजेंद्र जैन यांनी सुद्धा यासंदर्भात खा. प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून अल्पसंख्याक विकास विभागाकडे पाठपुरावा केला होता, तर खा. प्रफुल्ल पटेल यांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यासोबत चर्चा करून निधी उपलब्ध करून देण्यास सांगितले होते. त्यानंतर या विभागाने ६७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या अंतर्गत गोंदिया तालुक्यातील चंगेरा कब्रस्थान संरक्षक भिंत बांधकाम व गेट लावण्यासाठी ५ लाख रुपये, गोरेगाव तालुक्यातील पाथरी येथे कब्रस्थान संरक्षक भिंत बांधकामासाठी ६ लाख रुपये, अर्जुनी माेरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे कब्रस्थान भिंत बांधकामासाठी ७ लाख रुपये, दासगाव बु. येथे कब्रस्थानात संरक्षक भिंत बांधकामासाठी ५ लाख रुपये व कंटगीकला येथे कब्रस्थान संरक्षक भिंत बांधकामासाठी ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत, तर भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ येथील कब्रस्थान संरक्षक भिंत बांधकामासाठी ८ लाख रुपये, मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथील ईदगाह व दर्गाह संरक्षक भिंत बांधकामासाठी ७ लाख रुपये, पवनी तालुक्यातील कोसरा येथे कब्रस्थान संरक्षक भिंत बांधकामासाठी ६ लाख रुपये आणि भंडारा तालुक्यातील सावरी येथील कब्रस्थान संरक्षक भिंत बांधकामासाठी ६ लाख रुपये, तुमसर तालुक्यातील करडी येथील कब्रस्थान संरक्षक भिंत बांधकामासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.