खेळांसाठी ‘स्वदेशी’ला निधी
By Admin | Updated: February 2, 2015 23:08 IST2015-02-02T23:08:55+5:302015-02-02T23:08:55+5:30
स्वदेशी मंडळाच्या खेळांमुळे मुलांच्या बौध्दीक व शारीरिक गुणांना चालना मिळून त्यांना राज्यस्तरीय खेळात सहभागी होण्याची संधी मिळते. स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाला

खेळांसाठी ‘स्वदेशी’ला निधी
सडक-अर्जुनी : स्वदेशी मंडळाच्या खेळांमुळे मुलांच्या बौध्दीक व शारीरिक गुणांना चालना मिळून त्यांना राज्यस्तरीय खेळात सहभागी होण्याची संधी मिळते. स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाला महाराष्ट्र शासनाकडून काही निधी देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री व पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
स्वदेशी खेळोत्तेजक मंडळ जि.प. गोंदियाच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा संमेलनाचे सडक-अर्जुनी तालुक्यातील बाह्मणी-खडकी येथे मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते अध्यक्षीय मार्गदर्शन करीत होते.
ना. बडोले पुढे म्हणाले की, आघाडी शासनाने निर्मल ग्राम योजनेच्या माध्यमातून फक्त कागदोपत्री योजना दाखवून १०० टक्के निर्मल ग्राम केल्याचे दाखवले आहे. शासनाच्या मागील काळात काही योजनांच्या माध्यमातून क्रीडांगण व व्यायाम शाळा यासाठी निधी दिला जातो. पण बहुतेक ठिकाणी क्रीडा विभागांतर्गत व्यायाम शाळाच दिसत नसल्याचा त्यांनी खेद व्यक्त केला.
खा. नाना पटोले यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलित करण्यात आले. ना. बडोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अतिथी म्हणून जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, स्वदेशी खेळाचे स्वागताध्यक्ष मदन पटले, आ. संजय पुराम, प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी जयवंत पाडवी, सरपंच शारदा मेश्राम, अर्थ व बांधकाम सभापती प्रकाश गहाणे, समाजकल्याण सभापती कुसन घासले, बालकल्याण सभापती सविता पुराम, जि.प. मिलन राऊत, रुपाली टेंभुर्णे, जागेश्वर धनभाते, किरण गावराने, सडक-अर्जुनीच्या सभापती निर्मला उईके, उपसभापती दामोदर नेवारे, जिल्हा क्रीडा अधिकारी शीला भेंडारकर, पं.स. सदस्य पद्मा परतेकी, अर्जुन घरोटे, निमा राऊत, लक्ष्मीकांत धानगाये, उपसरपंच विलास शिवणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरूवातीला स्वदेशी खेळाबद्दल डॉ. महादेव चुटे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वदेशी खेळांचे महत्त्व व स्वदेशी खेळ कशासाठी खेळले पाहिजे तसेच गेल्या ७७ वर्षापासूनची क्रीडा सत्राची परंपरा अविरत सुरु ठेवू,असे मनोगत मदन पटले यांनी व्यक्त केले.
यावेळी खा. नाना पटोले यांनी विविध योजनांची माहिती सांगून स्वदेशी खेळ हे गोंदिया-भंडारा जिल्ह्यात राबविले जातात. यात प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीत २ ते ५ टक्के गुण देवून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करू.
बाह्मणी-खडकी परिसरात सिंचनाची सोय नसल्यामुळे लिफ्ट एरीकेशनच्या माध्यमातून तलावात पाणी टाकून सिंचनाची सोय कशी करता येईल. याचा नियोजनबध्द कार्यक्रम करून शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळेल.
संचालन राहुल कळंबे व रेणुका जोशी यांनी तर आभार विलास शिवणकर यांनी मानले. यावेळी जिल्ह्याच्या आठ तालुक्यातील शाळांच्या चमू घेवून शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)