कामगार कल्याण केंद्रामार्फत ४ लाख ८४ हजारांचा निधी वाटप
By Admin | Updated: April 25, 2017 00:52 IST2017-04-25T00:52:10+5:302017-04-25T00:52:10+5:30
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने दरवर्षी कामगार कल्याण निधी भरणा करणाऱ्या कामगार व त्यांच्या कुटुंबासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.

कामगार कल्याण केंद्रामार्फत ४ लाख ८४ हजारांचा निधी वाटप
विविध उपक्रम : कामगार व त्यांच्या कुुटुंबीयांसाठी अर्थसहाय्य
गोंदिया : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने दरवर्षी कामगार कल्याण निधी भरणा करणाऱ्या कामगार व त्यांच्या कुटुंबासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्याअंतर्गत यावर्षी केंद्राच्या वतीने चार लाख ८४ हजार रूपयांचे वाटप करण्यात आले.
कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तके, एमएससीआयटी सहायता योजना, गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव, सत्कार योजनेंतर्गत कामगारांच्या मुलांना निधी वाटप तसेच विविध गंभीर आजारांसाठी कामगारांना आर्थिक मदत केली जाते. यावर्षीसुद्धा कामगार कल्याण केंद्र गोंदियाच्या वतीने चार लाख ८४ हजार रूपयांचे वाटप करण्यात आले.
कामगारांच्या उत्थानासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगार कल्याण निधीचा वार्षिक भरणा केला जातो. यामध्ये कामगार ज्या ठिकाणी कार्यरत आहे, त्या कंपनीच्या संचालकाकडून कामगार कल्याण निधी जमा केली जाते. या माध्यमातून कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी कामगार कल्याण केंद्रामार्फत अनेक योजना राबविण्यात येतात. त्या माध्यमातून कामगार व त्यांच्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व पाठ्यपुस्तकांसाठी पैसा वाटप केला जातो. याशिवाय असाध्य रोग व गंभीर आजार झाल्यास कामगारांना व कुटुंबीयांना अर्थसहाय्य दिले जाते.
यावर्षी कामगार कल्याण मंडळांतर्गत कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना शिष्यवृत्ती योजनेंतर्गत ९५ विद्यार्थ्यांना दोन लाख ७१ हजार ५०० रूपयांचे वाटप करण्यात आले. पाठ्यपुस्तक सहायता योजनेंतर्गत १७ विद्यार्थ्यांना ११ हजार ८६१ रूपयांचे वाटप करण्यात आले. एमएससीआयटी योजनेंतर्गत आठ विद्यार्थ्यांना १३ हजार ६५० रूपयांचे वाटप करण्यात आले. असाध्य रोग व गंभीर आजार योजनेंतर्गत १३ कामगारांना एक लाख ८० हजार रूपयांचे वाटप करण्यात आले. क्रीडा शिष्यवृत्ती योजनेंतर्गत एका विद्यार्थ्याला दोन हजार रूपयांचे वाटप करण्यात आले. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी गुणगौरव सत्कार योजनेंतर्गत श्रद्धा सुभाष रामटेके या वर्ग बारावीच्या विद्यार्थिनीने ९१.५४ टक्के गुण मिळविल्याने तिला पाच हजार रूपये देवून सत्कार करण्यात आला.
कामगार कल्याण केंद्रामार्फत अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांचा कामगार व त्यांच्या कुटुंबीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कामगार कल्याण केंद्राचे संचालक ताम्रदीप जांभूळकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)