जिल्ह्यात लसीकरणाला ‘फुलस्टॉप’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:30 IST2021-04-07T04:30:04+5:302021-04-07T04:30:04+5:30
गोंदिया : कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे जिल्ह्यातील स्थिती आता अधिकाधिक गंभीर होत असतानाच जिल्ह्यातील लसींचा साठाच संपल्याने आता लसीकरणाला ‘फुलस्टॉप’ ...

जिल्ह्यात लसीकरणाला ‘फुलस्टॉप’
गोंदिया : कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे जिल्ह्यातील स्थिती आता अधिकाधिक गंभीर होत असतानाच जिल्ह्यातील लसींचा साठाच संपल्याने आता लसीकरणाला ‘फुलस्टॉप’ लागला आहे. त्यामुळे मंगळवारी (दि.६) काही लसीकरण केंद्रावर नागरिकांना आल्यापावली परत जाण्याची पाळी आली. त्यात आता लसींचा पुरवठा कधी होणार सांगता येत नसल्याने जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेला ‘फुलस्टॉप’ लागला आहे.
अवघ्या देशालाच पुन्हा एकदा आपल्या कवेत घेत असलेल्या कोरोनामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यातही राज्यातील स्थिती सर्वाधिक गंभीर असून जिल्ह्यातही त्याचे पडसाद दिसून येत आहे. जिल्ह्यात आता बाधितांची संख्या ३०० च्या घरात गेली असून हा आकडा दररोज वाढत चालला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आता अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. त्यानुसार, ४५ वर्षांवरील प्रत्येकच व्यक्तीचे लसीकरण करण्याचे आदेश शासनाने दिले आहे. त्यानुसार, जिल्ह्यातही लसीकरणाला गती देण्यात आली असून आतापर्यंत एक लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
यामुळेच लसींची मागणी वाढली असून आता जिल्ह्यात पुरविण्यात आलेला लसींचा साठा संपलेला आहे. सोमवारी (दि. ५) आटोपलेल्या लसीकरणानंतर जिल्ह्यातील काही केंद्राकडे सुमारे १,५०० डोस उपलब्ध होते. मंगळवारी (दि. ६) त्यांचा उपयोग केल्यानंतर मात्र तो साठा संपला असून आता लसीकरणाला पूर्णपणे ‘फुलस्टॉप’ लागल्याची माहिती आहे. यामुळे मात्र काही केंद्रावरून नागरिकांना आल्या पावली परत जावे लागले. त्यातही लसींचा पुरवठा कधी होणार याबाबत काहीच स्पष्ट माहिती नसल्याने लसीकरण कधी सुरू होणार हे सांगणे कठीण आहे.
---------------------------------
कशी देणार कोरोनाला मात
कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढत असून यावर आवर घालण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करण्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यानुसार, लसीकरणाला गती देण्यात आली आहे. मात्र आता मधातच लसींचा साठा संपल्याने लसीकरणासाठी नागरिक पुढे येत असतानाच त्यांना लसीकरणाला मुकावे लागण्याची पाळी आली आहे. जिल्ह्यात एकीकडे कोरोना कहर करीत असून दुसरीकडे लसीकरण थांबल्याने नागरिकांची धाकधूक वाढली आहे. अशात कोरोनाला कशी मात देणार असा सवालही नागरिक करीत आहेत.