शेतमजुरांचा एसडीओ कार्यालयावर मोर्चा
By Admin | Updated: July 8, 2016 01:54 IST2016-07-08T01:54:56+5:302016-07-08T01:54:56+5:30
शेतकरी- शेजमजूर-दलीत-आदिवासी विरोधी निती व जिवघेण्या महागाईच्या विरोधात भारतीय शेत मजूर युनियनच्या देवरी कौसींलच्यावतीने एसडीओ ...

शेतमजुरांचा एसडीओ कार्यालयावर मोर्चा
पटले यांची मागणी : सीईओंना दिले निवेदन
गोंदिया : शेतकरी- शेजमजूर-दलीत-आदिवासी विरोधी निती व जिवघेण्या महागाईच्या विरोधात भारतीय शेत मजूर युनियनच्या देवरी कौसींलच्यावतीने एसडीओ कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. क्रांतीकारी शहीद भगतसिंग कामगार भवन येथून महासचिव शेखर कनौजिया यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता.
वन व महसूल जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे, वन हक्क कायद्यातील गैर आदिवासींकरिता असलेली तीन पिढ्याच्या दाखल्याची अट रद्द करावी, मनरेगा कायदा मजबूत करुन वर्षातून २०० दिवस काम व ३०० रुपये दैनिक मजुरी दर आठवड्याला देण्यात यावी, प्रत्येक गरजू कुटूंबाला ३ लाख रुपयांचे घरकूल बनवून देण्यात यावे, बीपीएल कार्डावर दरमहा ३५ किलो रेशन स्वस्त दरात देण्यात यावे, सतत वाढत्या महागाईला पाहता सर्व निराधारांना किमान १५०० रुपये देण्यात यावे व वृद्ध निराधारांसाठी ६५ ऐवजी ६० वर्षांची अट ठेवण्यात यावी, बीपीएलची नवीन यादी बनविण्यात यावी, तिव्रगतीने वाढत्या महागाईवर आळा घालून तात्काळ जमाखोरी, मुनाफाखोरी, काळाबाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या गोदामात छापे घालून त्यांच्यावर कडक कारवाई करा, निराधारांचे प्रलंबित प्रकरण निकाली काढण्यात यावे आणि निराधारांना मानधन नको, कायदा करण्यात यावा आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
दरम्यान उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले. मोर्चासाठी बाबुलाल पारधी, यादोराव वाढई, पवन मानकर, मोतीराम कोराम, रामदास नंदरधने, रेखा ताराम, शांता शहारे, पंचशिला नंदेश्वर, सुक्षकला नंदागवळी, पुष्पा परतेकी, उर्मिला मानकर, गणपत फुंडे आदिंनी सहकार्य केले. (वार्ताहर)