शहरवासी व व्यापाऱ्यांना रान मोकळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 05:00 AM2021-06-12T05:00:00+5:302021-06-12T05:00:06+5:30

अनलॉक करताना शासनाने नियमांचे कठोरतेने पालन करावे लागणार असे स्पष्ट केले आहे. मात्र शहरातील चित्र बघता येथे कोरोना कधी आलाच नव्हता असे दिसून येत आहे. बाजारपेठेतील गर्दी नियमांना धुडकावून होत असून शहरवासी नियम पाळत नसतानाच व्यापारीही नियमांना बगल देत आपला व्यापार करीत असल्याचे दिसत आहे. एकंदर मागील वर्षी लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर तयार झालेली स्थिती आता पुन्हा दिसून येत आहे.

Free the townspeople and traders | शहरवासी व व्यापाऱ्यांना रान मोकळे

शहरवासी व व्यापाऱ्यांना रान मोकळे

googlenewsNext
ठळक मुद्देनियम धुडकावून नागरिक रस्त्यावर : कडक अंमलबजावकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्य शासनाने लॉकडाऊन शिथिल केले असून नागरिक तसेच व्यापारी वर्गाला मोठा दिलासा आहे. मात्र ही शिथिलता देताना नियमांची अंमलबजावणी करावी लागणार असे स्पष्ट आदेश दिले आहेत. मात्र शहरवासी व व्यापाऱ्यांना फक्त शिथिलताच लक्षात असून नियमांना धुडकावून एकच गर्दी होत आहे. अशात मात्र नियमांची अंमलबजावणी करवून घेण्याची जबाबदारी असलेल्या शासकीय यंत्रणेतील एकाही विभागाचे याकडे लक्ष नाही. परिणामी शहरवासी व व्यापाऱ्यांना रान मोकळे असून त्यांचा मनमर्जीपणा पुन्हा सुरू झाल्याचे दिसत आहे. 
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर आजही अंगावर काटे आणणारा आहे. या लाटेत कुणाचे काय हिरावून गेले याचा कुणीची अंदाज लावू शकत नाही. कोरोनाचा हा कहर कमी करण्यासाठी राज्यात शासनाला दुसऱ्यांदा लॉकडाऊन लावण्याची गरज पडली. आता दुसरी लाट ओसरत असून कोरोनाचा कहर कमी झालेल्या जिल्ह्यांना दिलासा देत राज्य शासनाने तेथील लॉकडाऊन शिथिल केले आहे. यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश असून जिल्ह्यात अनलॉक करण्यात आले आहे. मात्र अनलॉक करताच आता शहरवासी व व्यापारी गेलेले दिवस विसरून पुन्हा एकदा अतिरेक करताना दिसत आहेत. 
अनलॉक करताना शासनाने नियमांचे कठोरतेने पालन करावे लागणार असे स्पष्ट केले आहे. मात्र शहरातील चित्र बघता येथे कोरोना कधी आलाच नव्हता असे दिसून येत आहे. बाजारपेठेतील गर्दी नियमांना धुडकावून होत असून शहरवासी नियम पाळत नसतानाच व्यापारीही नियमांना बगल देत आपला व्यापार करीत असल्याचे दिसत आहे. एकंदर मागील वर्षी लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर तयार झालेली स्थिती आता पुन्हा दिसून येत आहे. असे असतानाही प्रशासनाच्या एकाही विभागाकडून यावर नजर ठेवली जात नसल्याची तेवढीच शोकांतीका आहे. शहरवासी व व्यापारी नियम तोडत असल्याने यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. 
 

ना मास्क - ना शारीरिक अंतराचे पालन 
- कोरोनाला दूर ठेवण्यासाठी नियमित मास्क लावणे व शारीरिक अंतराचे पालन करणे हेच सूत्र आहे. मात्र शहरातील आजची स्थिती बघता ना मास्क- ना शारीरिक अंतराचे पालन केले जात आहे. विशेष म्हणजे, सर्वसामान्य नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असतानाच व्यापारीही आपल्या दुकानांत या नियमांची अंमलबजावणी करवून घेताना दिसत नाही. यावर वेळीच आवर घालण्याची गरज आहे.
नगर परिषदेचे पथक गायब 
- शहरातील बाजारपेठ तसेच प्रत्येकच भागात कोरोना विषयक नियमांची अंमलबजावणी व्हावी यासाठी नगर परिषदेने पथक तयार केले होते. हे पथक या सर्व बाबींवर नजर ठेवून होते व वेळी दंडात्मक कारवाई करीत होते. मात्र आता हे पथक गायब दिसेनासे झाले आहे. त्यांना पुन्हा एकदा एव्क्टीव्ह करण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

Web Title: Free the townspeople and traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.