बैठकी बाजार वसुलीचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 21:36 IST2018-04-21T21:36:57+5:302018-04-21T21:36:57+5:30
शहरातील बैठकी बाजार वसुलीच्या विषयाला स्थायी समितीच्या सभेत मंजुरी मिळाली. त्यामुळे शहरात आता कंत्राटदाराकडून बाजार वसुलीचा प्रयोग होणार हे स्पष्ट झाले आहे. यांतर्गत कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात आले असून करारही करण्यात आला आहे.

बैठकी बाजार वसुलीचा मार्ग मोकळा
कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील बैठकी बाजार वसुलीच्या विषयाला स्थायी समितीच्या सभेत मंजुरी मिळाली. त्यामुळे शहरात आता कंत्राटदाराकडून बाजार वसुलीचा प्रयोग होणार हे स्पष्ट झाले आहे. यांतर्गत कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात आले असून करारही करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच बाजार वसुलीचा शुभारंभ होणार असल्याचे दिसून येत आहे.
नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या पदग्रहण समारंभात बैठकी बाजार वसुली बंद करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून नगर परिषदेची बाजार वसुली बंद झाली होती. अशात नगर परिषदेला वार्षिक सुमारे सात लाख रूपयांचा तोटा सहन करावा लागत होता. शिवाय नगर परिषद अधिनियमांत बाजार वसुली बंद केल्यास तेवढ्याच रकमेची पर्यायी व्यवस्था करावी असे नमूद आहे. यावर नगर परिषदेने बैठकी बाजार वसुलीसाठी १० मार्च रोजी निविदा काढली होती. या निविदेंतर्गत २६ तारखेला इ-लिलाव करणयात आला व त्यात इच्छूकांकडून आॅनलाईन बोली लावण्यात आली. यामध्ये शहरातील बजरीवाला बिल्डींग मटेरियल सप्लायर फर्मचे राजकुमार उमाशंकर पटले यांनी १६ लाख ५५ हजार रूपयांची महत्तम बोली लावली होती.
दरम्यान बाजार वसुलीसाठीच्या दराला स्थायी समितीच्या सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले. स्थायी समितीत भारतीय जनता पक्षाचे सर्वाधीक सदस्य असल्याने बाजार वसुलीच्या विषयाला मंजुरी मिळाली. त्यामुळे संबंधीत कंत्राटदाराला बाजार वसुलीचे कंत्राट दिले जाणार हे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार नगर परिषदेने सोमवारी (दि.१६) कंत्राटदार पटले यांनी कार्यादेश दिला असून गुरूवारी (दि.१९) करार करण्यात आला आहे. म्हणजेच, नगर परिषदेकडून आवश्यक ती कारवाई करण्यात आली असून आता कंत्राटदार पटले कधीही बाजार वसुली सुरू करू शकतात.
तीन टप्प्यात देणार पैसे
बाजार वसुलीसाठी पटले यांनी १६.५५ लाखांची महत्तम बोली लावली होती. यामुळे त्यांनाच बाजार वसुलीचा कंत्राट दिला जाणार हे स्पष्ट होते. त्यामुळे पटले यांनी बोलीच्या १० टक्के म्हणजेच एक लाख ६५ रूपये नगर परिषदेत सुरक्षा ठेव जमा केले आहे. याशिवाय बोलीच्या रकमेच्या समान तीन भागात त्यांना नगर परिषदेला पैसे द्यावयाचे आहेत. यासाठी नगर परिषद त्यांच्याकडून तीन धनादेश घेणार आहे. तर कंत्राटदार पटले यांना १ जुले, १ आॅक्टोबर व १ जानेवारी रोजी नगर परिषदेत पैसे जमा करावयाचे आहेत.
गरज पडल्यास आंदोलनाची तयारी
कंत्राटी तत्वावर बाजार वसुलीचा कॉंग्रेस पक्षाकडून विरोध करण्यात आला आहे. यासाठी कॉंग्रेस पक्षातील नगरसेवकांनी जिल्हाधिकारी व आमदारांना निवेदन दिले होते. तसेच स्थायी समितीच्या सभेत कॉँग्रेसचे नगरसेवक व नगर परिषद गट नेता शकील मंसूरी, नगरसेवक सुनील तिवारी व आघाडीचे सदस्य सचिन शेंडे यांनी कंत्राटी बाजार वसुलीचा विरोधही केला होता. मात्र भाजपचे संख्याबळ जास्त असल्याने स्थायी समितीच्या सभेत प्रस्ताव पारीत झाला. अशात कंत्राटी तत्वावर बाजार वसुली होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र यादरम्यान एखादी अप्रिय घटना घडल्यास त्याला नगर परिषद प्रशासन जबाबदार राहणार. तसेच गरज पडल्यास कॉँग्रेस पक्ष आंदोलन करणार असे गट नेता मंसूरी यांनी सांगीतले.
३१ मार्चपर्यंतचे कंत्राट
नगरपरिषदेने बाजार वसुलीसाठी टाकलेल्या निविदेतील अटी-शर्तीनुसार पटले यांना येत्या ३१ मार्चपर्यंतचा कंत्राट दिला जाणार आहे. या कालावधीत ते त्यांच्या करारातंर्गत येणाऱ्या व्यवसायीकांकडून वसुली करू शकतील. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत पटले यांना त्यांनी लावलेल्या बोलीची रक्कम काढावयाची आहे.