नागपूर मार्गावर मालगाड्यांसाठी बनणार चौथा ट्रॅक
By Admin | Updated: February 26, 2017 00:25 IST2017-02-26T00:25:07+5:302017-02-26T00:25:07+5:30
बजेटमध्ये रेल्वेने बिलासपूर ते रायपूरवरून नागपूरपर्यंत चौथा ट्रॅक मंजूर केली आहे. ४१२ किमीच्या या नवीन रेल्वे ट्रॅकच्या

नागपूर मार्गावर मालगाड्यांसाठी बनणार चौथा ट्रॅक
तीन ट्रॅकवर प्रवासी गाड्या : धावणार हायस्पीड ट्रेन
गोंदिया : बजेटमध्ये रेल्वेने बिलासपूर ते रायपूरवरून नागपूरपर्यंत चौथा ट्रॅक मंजूर केली आहे. ४१२ किमीच्या या नवीन रेल्वे ट्रॅकच्या सर्वेसाठी बजेटमध्ये निधीसुद्धा मंजूर करण्यात आला आहे. या चौथ्या ट्रॅकवरून केवळ मालगाड्या धावणार आहेत.
सद्यस्थितीत बिलासपूर-नागपूरच्या दरम्यान दोन ट्रॅक सुरू आहेत. तिसऱ्या ट्रॅकचे काम काही प्रमाणात पूर्ण झालेला आहे. या तिसऱ्या ट्रॅकवर हायस्पीड रेल्वेगाड्या धावतील. सदर तिन्ही ट्रॅकवर प्रवासी गाड्या चालविण्यात येतील. तर सध्या असलेल्या दोन ट्रॅकवर एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्या चालतील. तिसरी लाईन पूर्णत: हायस्पीड गाड्यांसाठी रिकामी सोडली जाईल. तर चौथ्या ट्रॅकवर केवळ मालगाड्या धावतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
रायपूर ते दुर्गच्या दरम्यान १६० किमीच्या गतीने हायस्पीड गाड्या चालविण्यासाठी सर्व गरज असलेल्या बाबींचा सर्वे करण्यात आला आहे. बाधा किंवा अडथळा होवू नये यासाठी या हायस्पीड कॉरीडोरला फॅन्सिंग व बेरिकेटींग घालण्यात येईल. रायपूर मंडळाने पहिल्या चरणात एका वर्षाचे अंतर १९ किमी लाईनच्या फेन्सिंगसाठी पहिली निविदा जाहीर केली आहे. दुर्गपर्यंत वेगवेगळ्या भागात लाईनच्या दोन्हीकडे जवळपास ४० किमी लांब बेरीकेडींगसुद्धा करावी लागेल, ही बाब सर्वेमध्ये समोर आली आहे. रेल्वे बोर्डाने नागपूर ते बिलासपूर दरम्यान ४११ किमी हायस्पीड कॉरीडोरसाठी ९६४ कोटी रूपयांचा प्रोजेक्ट तयार केला आहे.
दुर्ग-बिलासपूरच्या दरम्यान जवळपास १४० किमीमध्ये तिसरी लाईन बनून तयार झाली आहे. दुर्ग ते राजनांदगावच्या दरम्यान २८ किमीच्या तिसऱ्या लाईनचे काम एप्रिल महिन्यात पूर्ण होवून जाईल. तेथे दोन मोठे व २१ लहान पुलांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. राजनांदगाव ते नागपूरपर्यंत तिसरी लाईन घालण्यात काही अडचणी आहेत. यात ५० किमीपेक्षा अधिक अंतराच्या क्षेत्रात दाट जंगल व पहाड आहेत. जवळपास २६२ किमीच्या या रेल्वे लाईनवर ७५ लहान-मोठे पूल आहेत. (प्रतिनिधी)
दुर्ग-नागपूर दरम्यानचे काम बाकी
बिलासपूर ते नागपूरच्या दरम्यान तिसऱ्या लाईनचे काम तीव्र गतीने सुरू आहे. यासाठी टेंडर लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. बिलासपूर रायपूरच्या दरम्यान तिसऱ्या लाईनचा ६० टक्के भाग बाकी आहे. त्याचप्रमाणे दुर्ग ते नागपूरपर्यंतच्या दरम्यानसुद्धा काही काम बाकी आहे. परंतु वर्षभरात हे काम पूर्ण होईल, असे मानले जात आहे. चौथी लाईन छत्तीसगडमधील खनिज संपदेच्या वाहतुकीसाठी राहणार आहे. केंद्र शासन चौर्थी लाईन घालू इच्छिते. त्यामुळे भविष्यात रेल्वेगाडा वाढल्या तरी फारसा फरक पडणार नाही.
मालगाड्यांसाठी थांबविल्या जातात पॅसेंजर गाड्या
सध्या दोन ट्रॅक अस्तित्वात आहेत. याच ट्रॅकवरून मालगाड्या व प्रवासी गाड्या दोन्ही धावतात. मात्र मालगाड्यांना पुढे काढण्यासाठी पॅसेंजर गाड्यांना खूप वेळपर्यंत रेल्वे स्थानकांमध्ये थांबवून ठेवले जाते. या प्रकारामुळे प्रवासांना नाहकच मनस्ताप सहन करावा लागतो व त्यांच्या वेळेचा खोळंबा होतो. परंतु तिसरी लाईन व त्यानंतर केवळ मालगाड्यांसाठी चौथी लाईन तयार झाली तर रेल्वेचा प्रवास सर्वांसाठी आनंददायक व लाभदायक ठरू शकेल.