चार वर्षांचा प्रवास भत्ता व देयके प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:29 IST2021-04-20T04:29:55+5:302021-04-20T04:29:55+5:30
इसापूर : रोजगार हमी राबविण्यात ग्रामरोजगार सेवकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, मजुरांना त्यांच्या कामाच्या बदल्यात मजुरी मिळते. मात्र, गेल्या चार ...

चार वर्षांचा प्रवास भत्ता व देयके प्रलंबित
इसापूर : रोजगार हमी राबविण्यात ग्रामरोजगार सेवकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, मजुरांना त्यांच्या कामाच्या बदल्यात मजुरी मिळते. मात्र, गेल्या चार वर्षांपासून ग्रामरोजगार सेवकांना त्यांना लागू असलेला प्रवास भत्ता अल्पोपहार भत्ता न मिळाल्यामुळे तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांवर उपासमारीची पाळी आली आहे. मात्र, प्रशासनाने अद्यापही याची दखल घेतली नाही.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा शासन स्तरावरून मोठा गाजावाजा करून अकुशल मजुरांना कामे शासनाकडून देण्यात आली. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ७० ग्रामपंचायती असून, मोठ्या प्रमाणावर रोजगार हमीची कामे केली जातात. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सन २००६ पासून ग्रामरोजगार सेवक म्हणून एकाची निवड केली आहे. त्या गावचा ग्रामरोजगार सेवक म्हणून मजुरांना कामे उपलब्ध करून देणे, तसेच काम सुरू करून मजुरांची हजेरी पत्रक भरणे, एकंदरीतच रोजगार हमी राबविण्यात ग्रामरोजगार सेवकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. मजुरांना त्यांच्या कामाच्या बदल्यात मजुरी मिळते. मात्र, गेल्या चार वर्षांपासून ग्रामरोजगार सेवकांना त्यांना लागू असलेला प्रवास भत्ता अल्पोपहार भत्ता न मिळाल्यामुळे तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांवर उपासमारीची पाळी आली आहे. मागील महिन्यात अर्जुनी-मोरगाव ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीने खंडविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी खंडविकास अधिकारी यांनी ५ एप्रिलपर्यंत तुमची मागणी पूर्ण करू साखळी उपोषण करू नका, असे लेखी आश्वासन दिले होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहयो यांनीही भ्रमणध्वनीवरून संघटनेच्या अध्यक्षासोबत बोलून आपली मागणी पूर्ण करू, आंदोलन करू नका, असे सांगितले होते. मात्र, त्यांनी आश्वासनाची पूर्तत: केली नाही. त्यामुळे रोजगार सेवकांवर उपासमारीची पाळी आली आहे.
...........
कामाच्या तुलनेत मानधन मात्र अल्पच
ग्रामरोजगार सेवकांना रोजगार हमी योजनेचे अनेक कामे करावी लागतात. मजुरांचे हजेरी पत्रक काढणे, कामावर हजेरी घेणे, काम पूर्ण झाल्यानंतर मोजमाप करणे, मोजमाप पुस्तिका भरल्यानंतर हजेरी पत्रकात मजुरांची मजुरी भरणे, तसेच इतर अनेक कामे राेजगार सेवकांकडून करून घेतली जातात. त्या बदल्यात ग्रामरोजगार सेवकांना सव्वादोन टक्के मानधन, तसेच पंचायत समिती स्तरावर जाण्या-येण्यासाठी प्रवास भत्ता अल्पोपहार भत्ता शासन स्तरावरून दिला जातो, पण अद्यापही मानधन देण्यात आले नाही.
.......
उधार उसनवारी करण्याची वेळ
अर्जुनी-मोरगाव तालुक्यात मागील चार वर्षांपासून प्रवास भत्ता, अल्पोपहार भत्ता, तसेच अनेक महिन्यांपासून मिळणारा मानधन देण्यात आला नाही, त्यामुळे ग्रामरोजगार सेवकांवर उपासमारीची पाळी आली आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असून, रोजगार हमीची कामे सुरू आहेत, रोजगार हमीच्या कामावर सामाजिक अंतर पाळले जाऊ शकत नाही, तरी अशा परिस्थितीमध्ये ग्रामरोजगार सेवक कामे करीत आहेत. मात्र, शासनाकडून ग्रामरोजगार सेवकासाठी कोरोनामुळे मृत्यू झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.