रेल्वेच्या चार गाड्या महिनाभरात होणार बंद
By Admin | Updated: August 22, 2015 00:16 IST2015-08-22T00:16:02+5:302015-08-22T00:16:02+5:30
बालाघाट ते जबलपूरला जाण्यासाठी नैनपूरपर्यंत नॅरोगेज रेल्वे मार्गाने प्रवास करावा लागतो. परंतु आता या नॅरो गेजला ब्रॉड गेजमध्ये बदलविण्यात येत असल्यामुळे .....

रेल्वेच्या चार गाड्या महिनाभरात होणार बंद
ब्रॉड गेजचे काम : गोंदियावरून जाणाऱ्या प्रवाशांना होणार त्रास
गोंदिया : बालाघाट ते जबलपूरला जाण्यासाठी नैनपूरपर्यंत नॅरोगेज रेल्वे मार्गाने प्रवास करावा लागतो. परंतु आता या नॅरो गेजला ब्रॉड गेजमध्ये बदलविण्यात येत असल्यामुळे दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेने नोव्हेंबर २०१५ पासून मेगा ब्लॉक जाहीर केला असून चार रेल्वे गाड्या बंद करण्याची घोषणा केली आहे. या प्रकारामुळे बालाघाट-जबलपूर व्हाया नैनपूर या मार्गाने ये-जा करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील प्रवाशांची डोकेदुखी वाढणार आहे.
रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या पत्रानुसार, जबलपूर-नैनपूर, छिंदवाडा-नागपूर, नैनपूर-बालाघाट, छिंदवाडा-नैनपूर (मंडला फोर्ट) या रेल्वे गाड्या बंद करण्यात येणार आहेत. जबलपूर-नैनपूर ही रेल्वेगाडी बंद करण्याची तारिख १ आॅक्टोबर २०१५ असल्याचे रेल्वे मार्ग बांधकाम विभागाने जाहीर केली आहे. छिंदवाडा-नागपूर ही गाडी १ नोव्हेंबर २०१५ पासून बंद करण्याची सूचना बांधकाम विभागाने केली. मात्र रेल्वे प्रशासनाने सदर तारखेत बदल करून १ जानेवारी २०१६ केली.
नैनपूर-बालाघाट गाडी बंद करण्याची तारित बांधकाम विभागाने १ डिसेंबर २०१५ ठरविली. तर रेल्वे प्रशासना त्यात बदल करून १ नोव्हेंबर २०१५ अशी निश्चित केली. तसेच छिंदवाडा-नैनपूर (मंडला फोर्ट) ही गाडी १ जानेवारी २०१६ पासून बंद करण्याचे बांधकाम विभागाने ठरविले. तर त्यात बदल करून रेल्वे प्रशासनाने १ डिसेंबर २०१५ असे केले आहे.
सद्यस्थितीत सदर संपूर्ण नॅरो गेज मार्गावर २१० कोचेस, ७१ गुड्स वेगन्स आणि ३७ लोकोज उपयोगात आणले जात आहेत. मात्र हे नॅरो गेज बंद झाल्यावर तीन गाड्यांसाठी ३५ कोचेसची गरज राहणार आहे. (प्रतिनिधी)
रेल्वे विद्युतीकरण व तिसरा ट्रॅक
गोंदिया ते चंद्रपूर या रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणासाठी वायरिंग पूर्ण करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय इतर काही कामे शिल्लक असल्यामुळे सदर मार्गावरून विद्युत ट्रेन कधी धावेल, हे निश्चितपणे सांगणे कठिण आहे. तसेच दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी व मालगाड्या धावत असतात. या कारणामुळे रेल्वे गाड्या विलंबाने धावणे ही नित्याचीच बाब होती. आता या मार्गावर तिसऱ्या ट्रॅकचे काम जोरात सुरू असून सदर काम राजनांदगावच्या जवळपासपर्यंत पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एस्कलेटर व लिफ्ट प्रलंबितच
सहा महिन्यांपूर्वी खा.नाना पटोले यांच्या हस्ते गोंदिया स्थानकाच्या प्लॅटफॉर्म-१ वर शेड बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. या वेळी त्यांनी गोंदिया स्थानकात एस्कलेटर व लिफ्टची सोय करण्यात येत असल्याची घोषणा केली होती. मात्र बराच कालावधी लोटूनही एस्कलेटर व लिफ्टच्या कामाचा शुभारंभदेखील करण्यात आला नाही. काम कुठे अडले, याबाबत कुणीही काही सांगत नाही. केवळ होम प्लॅटफॉर्मवर शेडचे काम सुरू असल्याचे रेल्वे अधिकारी सांगतात. या प्रकारामुळे अवघ्या सहा महिन्यात वृद्ध व अपंगांसाठी उपलब्ध होवू शकणारी एस्कलेटर व लिफ्टची सुविधा आता केव्हा उपलब्ध होणार? हे सांगणे कठिण झाले आहे.