रेतीचे चार ट्रॅक्टर पकडले
By Admin | Updated: April 9, 2017 00:06 IST2017-04-09T00:06:58+5:302017-04-09T00:06:58+5:30
परिसरामध्ये होणाऱ्या अवैध गौण खनिज वाहतुकीवर आळा बसावा, शासकीय महसूलामध्ये वाढ व्हावी या हेतूने

रेतीचे चार ट्रॅक्टर पकडले
४६ हजारांचा दंड : अवैध वाहतूक करणाऱ्यांना धक्का
अर्जुनी मोरगाव : परिसरामध्ये होणाऱ्या अवैध गौण खनिज वाहतुकीवर आळा बसावा, शासकीय महसूलामध्ये वाढ व्हावी या हेतूने तहसीलदार डी.सी. बोंबार्डे यांनी महसूल विभागाच्या सहकाऱ्यांसह धाड मोहीम सुरू केली. शुक्रवारी (दि.७) रात्री १ च्या दरम्यान केशोरी परिसरात गस्ती घालत असताना अवैधपणे रेती घाटावरुन ट्रॅक्टरद्वारे रेती भरुन वाहतूक करीत असताना ४ ट्रॅक्टर पकडले. त्यांच्याकडून ४६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
मध्यरात्री ट्रॅक्टरवर ही कारवाई करण्यात आल्याने अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्यांनी याचा चांगलाच धसका घेतली आहे. तहसीलदार डी.सी. बोंबार्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील रेती घाटावरुन अवैध वाहतूक होऊ नये म्हणून तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात मोहीम राबविण्यात येत आहे. शुक्रवारच्या रात्री १ वाजेच्या दरम्यान बोंबार्डे यांच्यासह नायब तहसीलदार कोकवार, तलाठी हरिणखेडे, केशोरी परिसरात गस्ती घालत होते. केशोरी येथील नक्टी घाटावरुन रेती वाहतूक करण्याचा कोणताही परवाना नसताना अवैधपणे खुलेआम रेतीची वाहतूक होत असल्याचे दिसून आले. त्यांनी केशोरी परिसरात आपल्या पाळत ठेवली. दरम्यान घाटावरुन अवैधपणे रेती भरुन आलेले ४ ट्रॅक्टर त्यांनी पकडले.
गौण खनिजाची अवैधपणे वाहतूक करणारे प्रतापगड येथील रमेश राऊत (ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५, डी ३९७५), महागावचे दुधराम लंजे (एमएच ३५ डी ८५७८), सुनील डोंगरवार (एमएच ३५ एपी ३०५७) आणि गोपी देशमुख या ट्रॅक्टर मालकांवर अवैधपणे गौण खनिजांची वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई करुन त्यांच्याकडून ४६ हजार २०० रुपये दंडात्मक वसुल करण्यात आले. तहसीलदाराच्या या कारवाईने अवैधपणे रेती चोरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. (शहर प्रतिनिधी)