चार तालुक्यांत अतिवृष्टी

By Admin | Updated: July 9, 2016 01:57 IST2016-07-09T01:57:33+5:302016-07-09T01:57:33+5:30

गेल्या ४८ तासांपासून जिल्ह्यात कमीअधिक प्रमाणात सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे शुक्रवारी अनेक भागात ....

Four talukas highway | चार तालुक्यांत अतिवृष्टी

चार तालुक्यांत अतिवृष्टी

जिल्हाभर संततधार : आमगाव, सडक अर्जुनी, सालेकसा, गोरेगावात पाणीच पाणी
गोंदिया : गेल्या ४८ तासांपासून जिल्ह्यात कमीअधिक प्रमाणात सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे शुक्रवारी अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले. गेल्या २४ तासात जिल्ह्यात ५८.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. आमगाव, सडक अर्जुनी, सालेकसा व गोरेगाव तालुक्यात ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे तिथे अतिवृष्टीची नोंद करण्यात आली.
जिल्ह्यात १ जून ते ८ जुलै २०१६ या कालावधीत सरासरी २८३.९ मिमी पाऊस झाला आहे. शुक्रवार ८ जुलै रोजी सकाळी ८ वाजतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ५८.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यात गोरेगाव तालुक्यात ८५.८ मिमी, आमगाव तालुक्यात ६९.३ मिमी, सालेकसा तालुक्यात ९३ मिमी आणि सडक-अर्जुनी तालुक्यात ७६.८ मिमी पाऊस पडल्याने या तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.
शुक्रवारी सकाळी ८ वाजतापर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस असा आहे. त्याची सरासरी कंसात दर्शविण्यात आली आहे. गोंदिया तालुका २८७.५ मिमी (४१.१), गोरेगाव तालुका २५७.४ मिमी (८५.८), तिरोडा तालुका २३०.६ मिमी (४६.२), अर्जुनी-मोरगाव तालुका १९१.६ मिमी (३८.३), देवरी तालुका १८६ मिमी (६२), आमगाव तालुका २७७.२ मिमी (६९.३), सालेकसा तालुका २७९ मिमी (९३) व सडक-अर्जुनी तालुक्यात २३०.५ मिमी (७६.८) पाऊस पडला आहे. यावर्षी आतापर्यंत सर्वाधिक पाऊस गोंदिया तालुक्यात तर सर्वात कमी देवरी तालुक्यात झाल्याचे दिसून येते.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १० जुलैच्या सकाळी ८.३० वाजतापर्यंत काही भागात मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. जनतेने सतर्क राहून जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे. शुक्रवारी दिवसभर संततधार सुरू असल्यामुळे काही छोट्या नाल्यांना पूर आला. त्यामुळे एसटीच्या काही गाड्यांना माघारी फिरावे लागले. (प्रतिनिधी)

धरणांचे बूड झाकले
यावर्षी उन्हाळ्यात अनेक मोठे जलाशय कोरडे झाले होते. गेल्या आठवडाभरातील पाण्यामुळे मोठ्या धरणांमध्ये काही प्रमाणात पाणी साचले आहे. त्यात ३१८.८५ दलघमी क्षमतेच्या इटियाडोह धरणात ४९.२५, शिरपूर जलाशयात (क्षमता १९२.५६ दलघमी) १८.६१ दलघमी, पुजारीटोला धरणात (क्षमता ४८.६९ दलघमी) ४.०६ दलघमी, कालीसराडमध्ये (क्षमता २७.७५ दलघमी) साठा निरंक आहे. याशिवाय संजय सरोवराची क्षमता ४१० दलघमी असून आजचा साठा ३६.८८ दलघमी आहे.
रोवणीला खोळंबा
यावर्षी पाऊस लांबल्यामुळे भातपिकाची नर्सरी आणि पर्यायाने रोवणीही खोळंबली होती. परंतू गेल्या आठवडाभरापासून दररोज येत असलेल्या पावसाच्या सरींमुळे काही शेतकऱ्यांनी रोवणीला जेमतेम सुरूवात केली होती. परंतू गुरूवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुन्हा रोवण्या खोळंबल्या आहेत.

Web Title: Four talukas highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.