चार महिन्यात १६ हजार ६६८ कारवाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2016 01:23 IST2016-05-15T01:23:11+5:302016-05-15T01:23:11+5:30
वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे यासाठी पोलीसांचा वाहतूक विभाग सज्ज आहे.

चार महिन्यात १६ हजार ६६८ कारवाया
वाहतुकीचे नियमभंग : १३ लाख २४ हजारांचा दंड वसूल
गोंदिया : वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे यासाठी पोलीसांचा वाहतूक विभाग सज्ज आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्याच्या कालावधीत वाहतूक नियंत्रण शाखा गोंदिया व जिल्हा पोलीसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. या चार महिन्यात १६ हजार ६६८ कारवाया करण्यात आल्या असून त्या वाहन चालकांकडून १३ लाख २३ हजार ७०० दंड वसूल करण्यात आला आहे.
वाहतूकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांना चपराक देण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने उन्हातान्हात कारवाईची धडक मोहीम राबविली. जिल्हाभरात ही कारवाई करून वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून वचक ठेवण्याचा प्रयत्न केला. जानेवारी महिन्यात ३ हजार २४२ या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्या वाहन चालकांकडून २ लाख ५४ हजार ९०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात २ हजार १७१ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.त्या वाहन चालकांकडून ४ लाख ३९ हजार ५०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. मार्च महिन्यात २ हजार २७७ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्या वाहन चालकांकडून ४ लाख ५० हजार ४०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात ३ हजार ९७८ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.त्या वाहन चालकांकडून १ लाख ७८ हजार ९०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात वाहनांवर कारवाई करण्यात आली. परंतु दंडाचे प्रमाण कारवाईच्या दृष्ट्रीने अत्यल्प असल्याने एप्रिल महिन्यातील कारवाईची रक्कम मे महिन्यात जुळणार असल्याचे वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्याने सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
२४ वाहनांचा निलंबनाचा प्रस्ताव
वारंवार दंड आकारुन किंवा सूचना देऊनही वाहतूक नियम मोडणाऱ्या २४ वाहनांना निलंबित करण्याचा प्रस्ताव वाहतूक शाखेने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे टाकला आहे. जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यात वाहने निलंबति करण्यासाठी एकही प्रस्ताव पाठवला नाही. मात्र मार्च महिन्यात १० तर एप्रिल महिन्यात १४ वाहन निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला. यात आमगाव येथील दोन वाहनांचा प्रस्ताव असून उर्वरित सर्व प्रकरण वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईचे आहेत. निलंबनाचे प्रस्ताव काळीपिवळी व आॅटो या वाहनाचे आहेत.